महाराष्ट्रशैक्षणिकसंपादकीयसामाजिक

चोखा चोखट निर्मळ, मोगरी परिमळ.

परभणी :आज संत चोखोबा तथा चोखामेळा महाराजांची पुण्यतिथी आहे. त्यांच्या मृत्युचा नक्की दिनांक माहिती नसला तरी परंपरेनं आजच्या तिथीला चोखोबांची आठवण काढली जाते. चोखोबांविषयी आपल्याला फार माहिती नाही. ते संत नामदेवांचे शिष्य होते. त्यांच्या परिवारातील अन्य लोक म्हणजे, त्यांची पत्नी सोयरा, बहिण निर्मळा, मेहुणा बंका आणि मुलगा कर्ममेळा हेही चोखोबांप्रमाणेच विठ्ठल भक्तीत रमलेले होते. चोखोबांचा मृत्यु मंगळवेढे येथे गावकुसाचे काम करीत असतांना झाला असे म्हणतात. त्यांच्या मृत्यूनंतरही त्यांच्या हाडांतून विठ्ठल नामाचा गजर ऐकू येत होता, यावरून नामदेवांनी चोखोबांची हाडे ओळखून ती गोळा केली व पंढरपूरला  विठ्ठल मंदिरासमोर त्यांची समाधी बांधली असे चरित्रकार सांगतात.
तत्कालीन सामाजिक विषमतेमुळे चोखोबा होरपळून निघाले. ते शूद्र-अतिशूद्र , गावगाडा, समाज जीवन, भौतिक व्यवहार, उच्चनीचता व वर्णव्यवस्था यांच्या विळख्यात अडकले. संत चोखामेळा हे प्रापंचिक गृहस्थ.
ते उदरनिर्वाहासाठी मोलमजुरी करत, पण ते विठ्ठलाच्या नामात सतत दंग असत. गावगाड्यातील शिवाशिवीच्या वातावरणात त्यांचा श्वास कोंडला जात होता. दैन्य, दारिद्र्य, वैफल्य यांमुळे ते लौकिक जीवनात अस्वस्थ होते. परंतु प्रत्यक्ष परमेश्वराने त्यांना जवळ केले, त्यांना संतसंग लाभला. त्यांना मंदिरांत प्रवेश नव्हता. श्रीविठ्ठलाला त्यांना इतरांप्रमाणे उराउरी भेटावे असे खूप वाटत होते. परंतु ते सावळे, गोजिरे रूप महाद्वारातूनच पाहावे लागे, ही खंत त्यांच्या मनात होती. त्याचं कारण म्हणजे ते जातीने महार होते. महारांना त्या काळी (चौदाव्या शतकात) अत्यंत हीन वागणूक मिळत होती. त्यांतून चोखोबांसारखा संतसज्जनही सुटला नाही. ‘हीन मज म्हणती देवा। कैसी घडो तुमची सेवा।’ असा उपरोधिक प्रश्र्न ते देवालाच विचारतात. त्यांच्या अभंगरचना हृदयाला भिडणार्‍या आहेत. त्यांना भोगावे लागलेले दु:ख, त्यांची झालेली अक्षम्य उपेक्षा, मानसिक छळ याचे पडसाद भावविभोरतेसह त्यांच्या काव्यरचनेत अभिव्यक्त झालेले दिसून येतात.
‘धाव घाली विठु आता। चालू नको मंद।
बडवे मज मारिती। ऐसा काही तरी अपराध।।’
‘जोहार मायबाप जोहार। तुमच्या महाराचा मी महार।
बहु भुकेला जाहलो। तुमच्या उष्ट्यासाठी आलो।।’
‘आमुची केली हीन याती। तुज कां न कळे श्रीपती।
जन्म गेला उष्टे खाता। लाज न ये तुमचे चित्ता।।’
‘ऊस डोंगा परि । रस नोहे डोंगा। काय भुललासी वरलीया रंगा।।
चोखा डोंगा परि। भाव नोहे डोंगा।।’
हे त्यांचे अभंग जनमानसामध्ये आजही लोकप्रिय आहेत. चोखोबांच्या रचनांत भक्ती, तळमळ, आध्यात्मिक उंची तर दिसेतच, तसेच उपेक्षेची खंत जाणवते आणि ‘वेदनेचा सूर’ ही लागलेला दिसतो, जो आजही आपले अंत:करण हेलावून टाकतो.
‘आम्हा न कळे ज्ञान न कळे पुराण। वेदांचे वचन न कळे आम्हा।।
चोखा म्हणे माझा भोळा भाव देवा। गाईन केशवा नाम तुझे।।’
‘जन्मता विटाळ मरता विटाळ। चोखा म्हणे विटाळ आदिअंती।।’
‘आदि अंती अवघा, विटाळ साचला। सोवळा तो झाला कोण न कळे।
चोखा म्हणे मज नवल वाटते। विटाळापरते आहे कोण।।’
चोखोबांचे हे सारे अभंग म्हणजे मानवतेला लागलेल्या भेदभावाच्या अस्पृश्यतेच्या गलिच्छपणाचे जीवंत पुरावे आहेत. हा तोच माणूस आहे ज्याविषयी पुढे तुकोबांनी म्हटले की, ‘तुका म्हणे तुम्ही विचारांचे ग्रंथ। तारिले पतित तेणे किती।।’ चोखोबांच्या विचारांची ही थोरवी आहे. जातीयतेच्या पाशातून आपण अजूनही पूर्णपणे सुटलेलो नाही. ती कायद्याने गेली तरीही मनातून गेलेली नाही. माणूस हा केवळ माणूस असतो, त्याचे विचार आणि आचार जर उत्तम असेल तर तो उत्तम मानावा. तसा तो नसेल तर त्याला माणूस करण्यासाठी प्रयत्न करावेत पण त्याचा अस्विकार अपमान करू नये. चोखोबांचे जगणे आठवतांना मन हेलावून जाते की ज्याने आयुष्यभर विठ्ठलाचे नामस्मरण केले त्याला एकदाही पंढरपुरातील विठ्ठलाचे प्रत्यक्ष दर्शन घेता आले नाही. कारण त्याला मंदिरात जाण्यास मनाई होती. कारण त्यांची जात. विठ्ठलही आपल्या या अनन्य भक्तासाठी कधी मंदिर सोडून बाहेर आला नाही. कारण तोही तिथल्या बडव्यांचा गुलामच होता. आज परिस्थिती निश्चित थोडी बदलली आहे. त्यासाठी चोखोबांसारख्या असंख्यांना मात्र आपल्या प्राणासही मुकावे लागले आहे. अशी वेळ कोणावर येणार नाही, आपल्या हातून कधी असले अस्पृश्यतेचे हीन कृत्य घडणार नाही याची मनाशी खूणगाठ बांधणे हीच या विठ्ठल भक्ताला उचित श्रद्धांजली ठरेल. त्यांत आपण कोणीही कमी पडणार नाही याचा विश्वास आहे.
 
संदर्भ – मराठी विश्वकोश)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button