स्थगिती दिलेल्या पोलीस अधिकाऱ्यांच्या अखेर बदल्या ; शिवसेना, राष्ट्रवादीतील वाद निवळला..

मुंबई : वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्यावरून शिवसेना आणि राष्ट्रवादीतील मतभेद निवळल्यानंत बुधवारी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या. त्यानुसार महेश पाटील, राजेंद्र माने, संजय जाधव, पंजाबराव उगले व दत्तात्रय शिंदे यांना अपर पोलीस आयुक्तपदी बढती देऊन त्यांची अन्यत्र बदली करण्यात आली आहे.
गृह विभागाने २० एप्रिल रोजी ३९ वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या होत्या. मात्र या बदल्या करताना आपल्याला विश्वासात न घेतल्याचे सांगत नगरविकास तथा ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी थेट मुख्यमंत्र्यांकडे दाद मागत या बदल्यांवर अवघ्या काही तासात स्थगिती आणली होती. त्यावरून गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनीही पक्षश्रेष्ठी शरद पवार आणि मुख्यमंत्र्यांकडे नाराजी व्यक्त केली होती. मात्र दोन्ही पक्षातील मतभेद आता निवळल्यानंतर या बदल्यावरील स्थगिती उठविण्यात आल्याचे आदेश गृहविभागाने निर्गमित केले आहेत. मात्र ही स्थगिती उठविताना उगले यांना ठाण्यातच पश्चिम प्रादेशिक विभागाचे अप्पर आयुक्त म्हणून तर दत्तात्रय शिंदे यांनाही ठाण्यात पूर्व प्रादेशिक विभागाचे अप्पर आयुक्तपद म्हणून बदली करण्यात आली. राजेंद्र माने यांची ठाण्यातील बदली रद्द करून सोलापूर पोलीस आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे, तर महेश पाटील आणि संजय जाधव यांची पूर्वीची बदली कायम ठेवण्यात आली आहे.
