आरोग्यआर्थिकमहाराष्ट्रसामाजिक

सेलू, परभणी येथील डॉक्टरांच्या लेटरहेडवर नशेच्या गोळ्यांची खरेदी; औरंगाबादेत दोघे ताब्यात..

औरंगाबाद : शहरातील नशेच्या गोळ्यांचा बाजार उठविण्यासाठी पोलिसांकडून धडक कारवाई करण्यात येत आहे.
यासाठीच नेमलेल्या ‘एनडीपीएस’ पथकाने गोळ्यांची विक्री करताना दोघांना पकडले. त्यांच्या चौकशीत परभणी, सेलू येथील डॉक्टरांच्या लेटरहेडवर लातूर, परभणीतील वेगवेगळ्या मेडिकलमधून गोळ्यांची खरेदी केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या कारवाईत ६०० नशेच्या गोळ्यांसह १० लाख २४ हजार २८२ रुपयांचा मुद्देमाल पथकाने जप्त केला आहे.
‘एनडीपीएस’ सेलचे सहायक पोलीस निरीक्षक मोसीन सय्यद यांना शहानूरमियाँ दर्गा चौकात एक जण गोळ्या (बटन) विकण्यासाठी येणार असल्याची माहिती मिळाली होती. या माहितीनुसार लावलेल्या सापळ्यात राम धोंडू काळे (रा. श्रेयनगर) याला पकडले. अंगझडतीमध्ये त्यांच्याकडे नायट्रोसन नावाच्या ४५ गोळ्या आढळून आल्या. तसेच विकलेल्या गोळ्यांचे १३९० रुपये आणि मोबाईल पोलिसांनी जप्त केला. काळेची अधिक चौकशी केल्यानंतर त्याने दीपक साहेबराव हावळे (रा.एन २, ठाकरेनगर) याच्याकडून गोळ्या खरेदी केल्याचे सांगितले. त्यानंतर पोलिसांनी हावळेचा शोध घेतला असता तो चारचाकीत (एमएच २० एफ यू ८०८६) होता. तो सुद्धा गोळ्यांची विक्री करीत होता. त्याच्याकडे नायट्रोसन नावाच्या ५५५ गोळ्यासह एक शस्त्र सापडले. त्याच्या चारचाकीसह इतर मुद्देमाल पोलिसांच्या पथकाने जप्त केला.
हावळेकडे गोळ्या कोठून आणल्या, याविषयी चौकशी केली. तेव्हा त्याने परभणी, सेलू येथील डॉक्टरांच्या लेटरहेडवर नशेच्या गोळ्या लातूर, परभणी येथील मेडिकलमधून खरेदी केल्या आहेत. या गोळ्या चढ्या दराने शहरात विक्री करण्यात येत होत्या. या दोन्ही आरोपींच्या विरोधात एनडीपीएस कायद्यानुसार उस्मानपुरा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवला आहे. ही कामगिरी सहायक निरीक्षक मोसीन सय्यद, सहायक फाैजदार नंदकुमार भंडारे, सय्यद शकील, प्रकाश गायकवाड, आनंद वाहूळ, धर्मराज गायकवाड, प्राजक्ता वाघमारे, शंकर सुदरहेडे व औषघी निरीक्षक जे.डी. जाधव यांच्या पथकाने केली.
अमली पदार्थांची विक्री होत असेल तर कळवा
आपल्या परिसरात, शेजारी जर कोणी गांजा, नशेच्या पदार्थांची विक्री करत असेल तर त्यांची माहिती पोलिसांना द्यावी, पोलीस तत्काळ कारवाई करतील. मागील काही घटनांमध्ये आरोपींनी नशेचे पदार्थ घेऊनच खून, मारामाऱ्यासह इतर प्रकारचे गुन्हे केल्याचे उघड झाले होते. त्यामुळे अंमली पदार्थ विक्री करणाऱ्यांवर कारवाईसाठी स्पेशल सेलची स्थापना केली. हा चमू उत्तम प्रकारे कार्य करत आहे. अंमली पदार्थांच्या ठोक विक्रेत्यांवर तर कारवाई होतच आहे. किरकोळ विक्रेतेही पोलिसांनी समजल्यास कारवाई सोपी जाईल.

  • डॉ. निखिल गुप्ता, पोलीस आयुक्त

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button