आरोग्यआर्थिकदेश-विदेशविशेष

देशात लवकरच ५ जी सेवेला सुरुवात – पंतप्रधान…..

नवी दिल्ली : अतिवेगवान, नवयुगातील सेवा आणि व्यवसाय प्रारूपांची पायाभरणी करणाऱ्या ५जी दूरसंचार सेवेला लवकरच सुरुवात होईल, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी सोमवारी स्वातंत्र्याला ७५ वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने लाल किल्ल्यावरून देशाला संबोधित करताना म्हणाले.
देशात ५ जी सेवेच्या युगात पाऊल ठेवत असून त्यासाठी फार काळ प्रतीक्षा करावी लागणार नाही. प्रत्येक गावापर्यंत ऑप्टिकल फायबर जाळे पोहोचवण्यात येत असून डिजिटल भारताचे स्वप्न गावांमधून पूर्णत्वास येणार आहे. देशातील गावांमध्ये चार लाख सार्वजनिक सेवा केंद्रे विकसित होत असून यातून देशाच्या ग्रामीण भागामध्ये चार लाख डिजिटल उद्योजक तयार होतील, असेही पंतप्रधान म्हणाले.
बहुप्रतीक्षित वेगवान ५जी दूरसंचार सेवा सुमारे पुढील महिनाभरात सुरू होण्याची अपेक्षा आहे. पहिल्या टप्प्यात देशातील निवडक १३ शहरांमध्ये या सेवेचे अनावरण केले जाण्याची शक्यता आहे. सरकार स्वदेशी बनावटीच्या, स्वदेशात विकसित आणि उत्पादित प्रगत दूरसंचार तंत्रज्ञानाला प्रोत्साहन देत आहे आणि त्याचा परिणाम म्हणून आज भारतामध्ये एक मजबूत ५ जी मोबाइल कम्युनिकेशन परिसंस्था उभी राहताना दिसत आहे. मागील सोमवारी, १ ऑगस्टला संपलेल्या दूरसंचार ध्वनिलहरींच्या देशातील आतापर्यंतच्या सर्वात मोठय़ा लिलावात विक्रमी दीड लाख कोटी रुपयांची बोली लावली गेली. मुकेश अंबानी यांच्या रिलायन्स जिओसह, भारती एअरटेल, व्होडाफोन-आयडिया या तीन मुख्य स्पर्धकांसह, गौतम अदानी यांच्या नेतृत्वाखालील अदानी डेटा नेटवर्क्‍स या कंपनीने पहिल्यांदाच दूरसंचार ध्वनिलहरींच्या लिलावात सहभाग घेतला. सात दिवस चाललेल्या ५जी ध्वनिलहरींच्या लिलावात सर्वाधिक बोली रिलायन्स जिओने लावली आहे.
महिन्याभरात ५जी सेवेला सुरुवात
भारती एअरटेल महिन्याभरात ५जी सेवेला सुरुवात करणार आहे आणि मार्च २०२४ पर्यंत देशातील सर्व शहरांमध्ये आणि बहुतांश ग्रामीण भागात वेगवान ५जी दूरसंचार सेवा पोहोचवणार आहे. तर देशातील सर्वात मोठी दूरसंचार कंपनी जिओने देशातील मोठय़ा एक हजार शहरांमध्ये ५जी सेवा पोहोचवण्याचे नियोजन पूर्ण केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button