महाराष्ट्रविशेषशहर

वाहतूक नियंत्रण कक्षाला आणखी एक संदेश ; सोमालियातील घटनांच्या पार्श्वभूमीवर भारतात योग्य खबरदारी घेण्याच्या सूचना…

मुंबई : मुबंई वाहतूक पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला शुक्रवारी आणखी एक संदेश मिळाला असून त्यात सोमालियातील घटनांच्या अनुषंगाने भारतात खबरदारी बाळगण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. संदेशात कोणत्याही प्रकारची धमकी देण्यात आली नसली तरी खबरदारीचा उपाय म्हणून केंद्रीय यंत्रणांना याबाबतची माहिती देण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले.
नुकताच वाहतूक नियंत्रण कक्षाला २६/११ प्रमाणे दहशतवादी हल्ला करण्याची धमकीचा संदेश पाठवण्यात आला होता.
रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धन तालुक्याच्या हरिहरेश्वर समुद्र किनाऱ्यावर गेल्या आठवड्यात माय लेडी हान नावाची अॉस्ट्रेलियन महिलेच्या मालकीची संशयास्पद बोट सापडली होती. या बोटीत तीन एके ४७ रायफल, काडतूसे, चॉपर असा शस्त्रसाठा सापडला होता. ही घटना ताजी असतानाच मुंबई पोलिसांच्या वाहतूक नियंत्रण कक्षाला पाकिस्तानातील एका क्रमांकावरुन २६/११ सारखा भीषण दहशतवादी हल्ला करण्याची धमकी देणारे संदेश आले आहेत. त्याप्रकरणी वरळी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. परंतु या दोन घटनांमुळे मुंबई पोलिसांसह तपास यंत्रणा सतर्क झाल्या आहेत. या पार्श्वभूमिवर मुंबई वाहतुक पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला शुक्रवारी एकच्या सुमारास एका अनोळखी क्रमांकावरून संदेश मिळाला. इंग्रजीमध्ये लिहिण्यात आलेल्या या संदेशात कोणत्याही प्रकारची धमकी देण्यात आलेली नाही. सोमालिया देशातील मोबाइल क्रमांकावरून हा संदेश पाठवण्यात आला असून त्यात त्यांच्या देशात घडलेल्या दहशतवादी घटनांच्या अनुषंगाने खबरदारी बाळगण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. या संदेशाची माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांसह गुन्हे शाखा, दहशतवाद विरोधी पथक(एटीएस), राष्ट्रीय तपास पथक(एनआयए) व वरळी पोलिसांना देण्यात आली आहे. संदेशात कोणत्याही प्रकारची धमकी देण्यात आलेली नाही, पण नुकत्याच घडलेल्या प्रकरणांच्या पार्श्वभूमिवर खरदारी म्हणून सर्व यंत्रणांना संदेशाबाबतची माहिती देण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button