
चेन्नई (तामिळनाडू) – ‘मंदौस’ चक्रीवादळामुळे तामिळनाडूच्या किनारी भागात मुसळधार पाऊस पडत आहे. जोरदार वारा आणि वादळामुळे शेकडो झाडे उन्मळून पडली आहेत. येथील 13 जिल्ह्यांमध्ये रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. शाळा, महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. चेन्नईमध्ये मुसळधार पाऊस आणि वाऱ्यामुळे 3 आंतरराष्ट्रीय विमानांसह 16 उड्डाणे रद्द करावी लागली. परिस्थिती लक्षात घेऊन चेन्नईत एनडीआरएफची तुकडी तैनात करण्यात आली आहे. दरम्यान, पुढील काही तास तामिळनाडूसाठी धोक्याचे असतील अशी शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. तसेच, जिल्हा आपत्ती प्रतिसाद दलाच्या 12 तुकड्या सज्ज ठेवण्यात आल्या आहेत. राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल आणि राज्य आपत्ती प्रतिसाद दलाचे सुमारे 400 कर्मचारी आधीच कावेरी डेल्टा भागांसह किनारपट्टीच्या भागात तैनात करण्यात आले आहेत अशी माहिती प्रशासनाने दिली आहे.