देश-विदेशविशेषसंपादकीय

सीमेवर पुन्हा भिडले भारत-चीन सैनिक; चौकीला ३०० चिनी सैनिकांनी घेरलेले….

नवी दिल्ली : अरुणाचल प्रदेशाला लागून असलेल्या प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर तवांग क्षेत्रात भारत व चीनच्या सैनिकांमध्ये गेल्या शुक्रवारी, ९ डिसेंबर रोजी संघर्ष झाल्याचे वृत्त असून त्यात दोन्ही देशांचे काही सैनिक किरकोळ जखमी झाले.
त्यापैकी ६ जखमी भारतीय जवानांना उपचारांसाठी गुवाहाटीच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. दोन वर्षांपूर्वी गलवान खोऱ्यात रक्तरंजित संघर्षानंतर दोन्ही देशांत झालेली ही पहिलीच चकमक आहे.
गेल्या शुक्रवारी चीनच्या सैनिकांनी भारतीय हद्दीत घुसखोरी करण्याचा केलेला प्रयत्न जवानांनी हाणून पाडला. यावेळी झालेल्या संघर्षात दोन्ही देशांचे काही जवान जखमी झाले. पण त्यानंतर दोन्ही देशांच्या सैन्याधिकाऱ्यांनी तत्काळ हस्तक्षेप करून आणखी रक्तरंजित होऊ शकणारा संघर्ष रोखला. या घटनेनंतर तवांग क्षेत्रातील भारतीय कमांडर व चिनी अधिकाऱ्यांमध्ये फ्लॅग मीटिंग होऊन या संघर्षाबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली.
कायम तणाव
n गलवान खोऱ्यात १५ जून २०२० रोजी मध्यरात्रीनंतर भारत व चीन यांच्या सैनिकांत संघर्ष झाला होता. त्यात चीनचे ४० सैनिक ठार व भारताचे २० जवान शहीद झाले होते. या घटनेनंतर दोन्ही देशांमध्ये कमालीचा तणाव निर्माण झाला होता. व्यापारी संबंधांवरही विपरित परिणाम झाला.
n पूर्व लडाखमध्ये पॅन्गाँग तलावाच्या परिसरात भारत व चीनचे सैनिक ५ मे २०२० पासून समोरासमोर उभे ठाकले. चिनी सैनिक या भागात भारतीय हद्दीत घुसखोरी करण्याचा प्रयत्न करत होते. त्याला भारतीय सैनिकांनी अटकाव केला होता.
गेल्या वर्षीही कुरापत
गेल्या वर्षी अरुणाचल प्रदेशमधील तवांग क्षेत्रामध्ये २०० चिनी सैनिकांनी घुसखोरीचा केलेला प्रयत्न भारतीय जवानांनी हाणून पाडला होता. त्यावेळीदेखील दोन्ही देशांच्या लष्करी अधिकाऱ्यांनी चर्चा केली व आपापल्या सैनिकांना माघारी जाण्याचे आदेश दिले होते.
सीमावर्ती भागात पायाभूत सुविधा निर्मितीवर भर
n सीमावर्ती भागात उत्तम पायाभूत सुविधा निर्माण करण्यावर केंद्र सरकारने गेल्या काही वर्षांत अधिक लक्ष केंद्रित केले आहे.
n ४० हजार कोटी खर्च करून फ्रंटियर हायवे बांधण्याचे काम हाती घेतले. अरुणाचल प्रदेश, लडाख आदी ठिकाणी चीन भारताच्या सतत कुरापती काढत आहे. त्या देशाच्या विस्तारवादी भूमिकेला चोख प्रत्युत्तर देणे आवश्यक आहे. त्यामुळे ईशान्य भारत असो वा अन्य सीमावर्ती राज्ये तिथे पायाभूत सुविधांचे अनेक प्रकल्प राबविले जात आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button