विजयस्तंभ अभिवादनासाठी अनुयायांची गर्दी, सोहळा मोठय़ा उत्साहात व शांततेत संपन्न….

पुणे : शिरूर तालुक्यातील कोरेगाव भीमा (पेरणे फाटा) येथे विजयस्तंभ अभिवादन सोहळ्यासाठी राज्यभरातून मोठय़ा संख्येने आलेल्या अनुयायांनी गर्दी केली होती. कोरोना महामारीनंतर प्रथमच हा शौर्य दिन उत्सव आणि विजयस्तंभ मानवंदना सोहळा निर्बंधमुक्त आणि मोठय़ा उत्साहाच्या वातावरणात शांततेत संपन्न झाला.
रात्री उशिरापर्यंत हा सोहळा सुरू होता.
पहाटेपासूनच 205 व्या शौर्य दिन उत्साहाला सुरुवात झाली. मुंबई, पुणे, विदर्भ, मराठवाडय़ासह राज्याच्या सर्व भागातून मोठय़ा संख्येने अनुयायी विजयस्तंभाला अभिवादन करण्यासाठी आले होते. प्रशासनाने केलेली चोख व्यवस्था, पार्ंकगची सोय आणि नियोजन यामुळे मोठी गर्दी असूनही आवश्यक त्या सुविधा मिळाल्या. सोहळ्यामध्ये शिस्त होती. पोलीस विभागाचे वरिष्ठ अधिकारी सोहळा शांततेत पार पडावा यासाठी नियंत्रण कक्षाद्वारे सीसीटीव्हीच्या माध्यमातून सर्व व्यवस्थेवर लक्ष ठेवून होते.
वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर, केंद्रीय मंत्री रामदास आठवले, शिवसेना उपनेत्या सुषमा अंधारे, प्रा. जोगेंद्र कवाडे, आमदार जितेंद्र आव्हाड, जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, पोलीस अधीक्षक अंकित गोयल, जिल्हा परिषदेचे प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत वाघमारे, रिपब्लिकन सेनेचे आनंदराज आंबेडकर, भीम आर्मीचे चंद्रशेखर आझाद, समाजकल्याण आयुक्त डॉ. प्रशांत नारनवरे, बार्टीचे महासंचालक धम्मज्योती गजभिये यांनी विजयस्तंभास अभिवादन केले. यावेळी समाजकल्याण उपायुक्त बी. ए. सोळंकी, जिल्हा समाजकल्याण अधिकारी प्रवीण कोरघंटीवार हे उपस्थित होते.
जिल्हा परिषदेने पिण्याचे पाणी आणि स्वच्छतेची चांगली सुविधा केली होती. आरोग्य पथकाद्वारे गरजूंना सेवा देण्यात आली. सकाळी जिल्हाधिकारी डॉ. देशमुख, पोलीस अधीक्षक गोयल यांच्यासह त्यांनी वाहनतळावर आलेल्या अनुयायांशी संवाद साधला. पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत केले. पोलीस आयुक्त रितेश कुमार यांनीही भेट देऊन व्यवस्थेची पाहणी केली. पीएमपीएमएलने लोणीपंद आणि कोरेगाव भीमा अशा दोन्ही बाजूने प्रत्येकी 140 बसेस सुरू ठेवल्या होत्या.