आर्थिकमहाराष्ट्रसंपादकीयसामाजिक

अण्णाभाऊ साठे म्हणाले होते, “ही पृथ्वी शेषनागाच्या फण्यावर नाही तर श्रमिकांच्या तळहातावर तोललेली आहे.” ..7 जानेवारी


चला प्रश्न विचारूया ….
श्रमिकांना आणि त्यांच्या श्रमांना आपण सन्मान देणार की नाही?
अण्णाभाऊ साठे म्हणाले होते, “ही पृथ्वी शेषनागाच्या फण्यावर नाही तर श्रमिकांच्या तळहातावर तोललेली आहे.” हे केवळ कोरडे शब्द नाहीत तर खरंच अश्मयुगापासून आजपर्यंत मानवाचा जो विकास झाला आहे तो श्रमिकांच्या श्रमामुळेच झाला आहे. या श्रमिकांमध्ये शेतात कष्ट करणारा शेतकरी, शेत मजूर आहे, त्याला मदत करणारा बलुतेदारीतील प्रत्येक घटक आहे, सफाई कर्मचारी आहे, उद्योगांमध्ये राबणारा कामगार आहे, रस्त्यावर वस्तू विकणारा फेरीवाला आहे, बांधकाम क्षेत्रात काम करणारा मजूर आहे, विविध ठिकाणी सेवा देणारा सेवक वर्ग आहे, घरकाम करणारा कामगार आहे आणि शारीरिक श्रम करणारे इतरही अनेक घटक आहेत. सध्या ‘बौद्धिक श्रमाला’ शारीरिक श्रमापेक्षा अधिक मोबदला आणि त्यामुळे सन्मान मिळतो. शारीरिक श्रम आणि ते करणारे श्रामिक यांच्याबद्दल मात्र हीनपणाची भावना समाजात रुजली आहे. ही भावना त्यांना मिळणारा अल्प मोबदला आणि त्यामुळे त्यांचे खालावलेले राहणीमान यामुळे निर्माण झाली आहे.
शाळेत आपल्याला श्रमप्रतिष्ठा या मूल्याबद्दल सांगितले जाते पण श्रम करण्याचे मूल्य शिकवले जात नाही किंवा शिकवलेले आवडत नाही. सूट-बूट आणि इस्त्रीचे कपडे घालणाऱ्या काही जणांना कष्ट करणारा हा वर्ग म्हणजे dirty people वाटतात. खरंतर नोकरी, उद्योगातून खालच्या आर्थिक वर्गातून मध्यम किंवा उच्च वर्गात गेलेला छोटासा वर्ग दैनंदिन गरजांसाठी आजही कनिष्ठ आर्थिक वर्गात असणाऱ्यांच्या बहुसंख्यांकांच्या श्रमावरच अवलंबून आहे. मात्र हे ‘श्रम विकत घेत असल्याचा’ खोटा अभिमान या पैसेवाल्यांना असतो. हे पैसेवाले हॉटेलिंगवर हजारो रुपये खर्च करतील पण भाजीची जुडी विकत घेताना घासाघीस करतील. मोठ मोठ्या मॉलमधून हजारो रुपयांचे कपडे विकत घेतील पण घरी कामाला आलेल्या कामगारांना त्यांच्या कामाचा मोबदला देताना हात आखडता घेतील. पर्यटनावर पैसे खर्च करताना मागेपुढे पाहणार नाहीत पण रिक्षाचे भाडे देताना मात्र वाद घालत बसतील. चुकीचे बोलणाऱ्या बॉससमोरही खाली मान घालून बसतील पण सेवकवर्गावर मात्र उगीच डाफरतील. स्वत:ची वेतन वाढ आणि सुविधांसाठी संप करणे यांना हक्क वाटेल पण कष्टकऱ्यांनी काम बंद करणे मात्र वेठीस धरणे वाटणार.
खरंतर, शारीरक श्रम करणाऱ्यांनाही बौद्धिक श्रम वाल्यांइतकेच सन्मानाने जगण्याचा अधिकार आहे. महागाईच्या झळा त्यांनाही बसतात. मग एवढ्या कमी पैशात ते कसे जगत असतील? त्यांनाही मुलंबाळं आहेत. त्यांच्या शिक्षणाचा, खर्च आहे. शिक्षणाची दुकानदारी झालेल्या या काळात त्यांची मुले कशी शिकत असतील? त्यांनाही आई-वडील, कुटुंबीय आहेत. त्यांच्या दवाखान्याचा खर्च आहे. सेवाभाव मागे पडून नफेखोरी वाढलेल्या आरोग्य व्यवस्थेच्या काळात त्यांच्या आरोग्याचे काय होत असेल? चांगल्या घरात रहावे, चांगले कपडे घालावे असे त्यांनाही वाटते. जागा आणि बांधकाम खर्च गगनाला भिडलेल्या काळात त्यांना भाड्याच्या घरात तरी समाधानाने राहता येत असेल का? वर्षातून एखाद्या वेळेस कुटुंबासह फिरायला जावे अशी त्यांचीही इच्छा असते. वर्षातून नाही दशकातून एकदा तरी सहकुटुंब सहलीला जाणे त्यांना जमत असेल का? या सर्वांसाठी ते करत असलेल्या श्रमाला योग्य मोबदला मिळणे हा त्यांचा अधिकार आहे. केवळ आर्थिक मोबदला नव्हे तर ज्या श्रमावर अवलंबून राहून आपण आरामदायी जीवन जगत असतो त्या श्रमाचा आणि श्रमिकांचा योग्य सन्मान करणे हे आपले कर्तव्य आहे. ते आपण बजावतो का? असे प्रश्न आपल्याला पडायला पाहिजेत. त्या प्रश्नांची योग्य उत्तरे आपण शोधली पाहिजेत. म्हणून स्वत: प्रश्न विचारण्याचा आणि स्वत:ला विचारलेल्या प्रश्नांना सहिष्णुतेने सामोरे जाण्याचा संकल्प आपण सर्वांनी नक्की करूया.
कृष्णात स्वाती 8600230660
krishnatswati@gmail.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button