आर्थिकमहाराष्ट्रविशेषशैक्षणिकसामाजिक

मोठा निर्णय! शिक्षक कमी असलेल्या शाळांवर आता स्वयंसेवक; ‘शाळा व्यवस्थापन’ला अधिकार….

सोलापूर : जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या दोन हजार ७९५ शाळांवर ४९२ शिक्षकांची पदे रिक्त आहेत. अकराशे शाळांमध्ये विद्यार्थी अधिक तर शिक्षक कमी अशी स्थिती आहे. त्या शाळांमधील विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेवर काही परिणाम होऊ नये म्हणून शिक्षक कमी असलेल्या शाळांवर स्वयंसेवक नेमण्याचा अधिकार शाळा व्यवस्थापन समितीला देण्यात आला आहे.

पण, त्यांचे मानधन लोकवर्गणीतून करावे लागते.
राज्यातील ५९ हजार जिल्हा परिषद शाळांमध्ये ३७ हजारांहून अधिक शिक्षकांची पदे रिक्त आहेत. त्यामुळे विद्यार्थी संख्या वाढूनही शिक्षकांअभावी गुणवत्तेवर परिणाम होऊ लागला आहे. खासगी शाळांशी स्पर्धा करताना जिल्हा परिषदेच्या काही शाळा देखील बंद कराव्या लागल्या आहेत. दक्षिण सोलापूर तालुक्यातील दोन शाळा शिक्षक नसल्याने विद्यार्थी कमी झाले आणि शेवटी त्या बंद कराव्या लागल्या आहेत. आता २० पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शंभरपेक्षा अधिक शाळा आहेत. त्या ठिकाणी विद्यार्थी वाढावेत, यासाठी प्रयत्न होत असतानाच त्या शाळा बंद करून जवळच्या शाळांमध्ये समायोजन करण्याचा मुद्दा पुढे आला होता. पण, बालकांचा शिक्षण हक्क कायद्यानुसार तशी कार्यवाही करता येत नाही. त्यामुळे आता त्या शाळा सुरूच ठेवल्या जाणार आहेत, परंतु तेथे असेच स्वयंसेवक तथा सेवानिवृत्त शिक्षक नेमले जाणार आहेत. आगामी शैक्षणिक वर्षापासून त्याची अंमलबजावणी केली जाणार आहे. दरम्यान, शिक्षक भरतीची प्रक्रिया एप्रिलमध्ये सुरू होणार असून, जवळपास ३५ हजार पदे भरली जाणार आहेत. तोपर्यंत सामाजिक बांधिलकीतून शाळा व्यवस्थापन समित्यांनी स्वत:च्या अधिकारात आपल्या गावातील, शाळांमधील विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढावी, टिकून राहावी यासाठी स्वयंसेवक नेमता येतील, असेही शालेय शिक्षण विभागाने स्पष्ट केले आहे.
शाळा व्यवस्थापन समिती नेमू शकते स्वयंसेवक
जिल्हा परिषद शाळांमध्ये शिक्षकांची पदे रिक्त आहेत. विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढावी, यासाठी शाळा व्यवस्थापन समितीला स्वयंसेवक नियुक्तीचा अधिकार आहे. त्यांचे मानधन लोकवर्गणीतून शाळा व्यवस्थापन समिती करेल.
– संजय जावीर, प्राथमिक शिक्षणाधिकारी, सोलापूर
महिला शिक्षिकांना दोनवेळा सहा महिन्यांची पगारी रजा
महिला शिक्षिकेला दोनदा सहा महिन्यांची प्रसूती रजा मिळते. त्यांना त्या काळातील पूर्ण वेतन दिले जाते. त्यावेळी संबंधित शिक्षिका आपल्या शाळेची तथा विद्यार्थ्यांची गुणवत्ता कायम टिकून राहावी, यासाठी स्वयंसेवक नेमू शकते. त्या व्यक्तीची पात्रता किमान (पदवी उत्तीर्ण) तेवढी असावी, ही एक अट आहे. रिक्त पदे मोठ्या प्रमाणावर असल्याने विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेवर परिणाम होत आहे. त्यामुळे स्वयंसेवक नेमून विद्यार्थ्यांना शिकवता येईल. त्यासाठी शाळा व्यवस्थापन समितीने पुढाकार घ्यायला हवा. जिल्ह्यातील ५२ ते ५६ शाळांवर तसे स्वयंसेवक नेमले गेले आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button