देश-विदेशविशेषशैक्षणिकसामाजिक

धन्य अजि दिन, जाहले गौतम बुद्धाचे अस्थी दर्शन; औरंगाबादकर अभूतपूर्व क्षणाने कृतार्थ….

औरंगाबाद : अडीच हजार वर्षांनंतर थायलंड येथून भारतात आलेल्या महाकारुणिक तथागत गौतम बुद्धांच्या पवित्र अस्थींचे दर्शन घेऊन औरंगाबादकर कृतकृत्य झाले.

थायलंड येथील ११० बौद्ध भिक्खू, भारतीय भिक्खू आणि हजारो उपासकांसह हा अस्थीकलश घेऊन परभणी येथून निघालेली ही धम्मपदयात्रा गुरुवारी रात्री औरंगाबादेत दाखल झाली. दुसऱ्या दिवशी शुक्रवारी केम्ब्रिज चौक ते तीसगावदरम्यान, संपूर्ण रस्त्यावर फुलांचा वर्षाव व रांगोळी काढून शहरवासीयांनी ठिकठिकाणी या पदयात्रेचे उत्स्फूर्तपणे स्वागत केले.
केम्ब्रिज चौक येथे मुक्कामी असलेली ही धम्मपदयात्रा शुक्रवारी सकाळी १० वाजता बुद्धांचा अस्थिकलश घेऊन निघाली. पदयात्रेच्या समोर फुलांनी सजविलेला तथागतांचा अस्थिकलश रथ, तर मागे भिक्खू संघ आणि हजारो उपासक ‘बुद्धं सरणं गच्छामी, धम्मं सरणं गच्छामी, संघं सरणं गच्छामी’चा घोष करत चालत होते. चिकलठाणा, म्हाडा कॉलनी, संजयनगर, मुकुंदवाडी, सिडको बसस्थानक चौक, सेव्हन हिल उड्डानपूल, आकाशवाणी चौक, मोंढा नाका उड्डानपूल, अमरप्रीत चौक, क्रांतीचौक, जुने हायकोर्ट, नवीन जिल्हा कोर्ट, एलआयसी कार्यालय, बाबा पंप, छावणी, नगर नाकापर्यंत असे ठिकठिकाणी शुभ्रवस्त्र परिधान केलेले उपासक- उपासिकांचे जथे सकाळपासूनच अस्थिकलश आणि पदयात्रेची प्रतीक्षा करीत होते.
पदयात्रेत थायलंड येथील जागतिक धम्मगुरू लाँगफुजी, भन्ते सोंगसेन फॅटफियन, भन्ते विचीयन अबोत, डॉ. एम. सत्यपाल, सिनेअभिनेते गगन मलिक व आयोजक सिद्धार्थ हत्तीअंबिरे यांच्यासह समता सैनिक दलाचे स्त्री-पुरुष जवान तसेच राजू शिंदे, गौतम लांडगे, डॉ. कल्याण काळे, शेख युसूफ, अशोक डोळस, बंडू कांबळे, राजू साबळे, विजय मगरे, कृष्णा भंडारे, जालिंदर शेंडगे, जयप्रकाश नारनवरे, गौतम खरात, डॉ. अरुण शिरसाट, पवन डोंगरे, दामूअण्णा कांबळे आदींसह विविध पक्ष- संघटनांचे पदाधिकारी व हजारो उपासक- उपासिका सहभागी झाल्या होत्या. तथागतांच्या अस्थींचे दर्शन व पदयात्रेच्या स्वागतासाठी रस्त्यावर जनसागर लोटला होता.
सुरुवातीला चिकलठाणा येथे माजी नगरसेवक रवी कावडे व बुद्धविहार समितीच्या पदाधिकाऱ्यांनी पदयात्रेचे उत्स्फूर्तपणे स्वागत केले. पुढे भिक्खू आणि उपासकांचा ताफा धूत हॉस्पिटलजवळील म्हाडा कॉलनी येथे पोहोचताच माजी नगरसेवक राजू शिंदे, कीर्ती शिंदे, चंदा भालेराव, युवराज भालेराव, गोरख देहाडे, भारत शिंदे, चक्रधर मगरे, शशिकला मगरे, निवृत्ती घोरपडे, पंचशीला घोरपडे, उत्तम दणके, अनुसया दणके, शिवाजी नरवडे, दीपाली मिसाळ व नागरिकांनी या पदयात्रेेचे स्वागत केले. तेथे भिक्खू संघाने धम्मदेसना दिली. त्यानंतर संजयनगर, मुकुंदवाडी व परिसरात माजी आ. सुभाष झांबड, भाऊसाहेब नवगिरे, महेंद्र म्हस्के, राहुल सावंत, बकूल भुईगड, अंकुश मगरे, श्रीकांत रणभरे, आनंद डोळस, राजू मगरे, आसाराम गायकवाड, सोपानराव मगरे, सतीश गायकवाड, श्याम जगधने, भगवान गायकवाड यांच्यासह स्थानिक उपासक- उपासिकांनी पदयात्रेचे स्वागत केले. पुढे सिडको बसस्थानक चौकात महेंद्र सोनवणे, भारती सोनवणे, विजय भिवसने, उत्तम बनकर, राहुल साबळे, श्रावण गायकवाड व नागरिकांनी स्वागत केेले. रामगिरी हाॅटेलसमोर एन- ३ परिसर येथे राजेश लाडे व आजूबाजूच्या उपासकांनी स्वागत केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button