क्रीडामहाराष्ट्रशैक्षणिक

डी.एड. कॉलेज बंद होणार नाहीत, दर्जावाढीची संधी दिली जाणार!….

जळगाव : नवीन शैक्षणिक धोरणामुळे राज्यातील सर्वच डी.एड. कॉलेज शैक्षणिक सत्र २०२३-२४ पासून बंद होणार असल्याची चर्चा असली तरी यासंदर्भात कोणतेही शासन आदेश नाही
मात्र, बी.एड.साठी १२ वीनंतर चार वर्षांचा अभ्यासक्रम शासकीय कॉलेजमध्ये सुरू होणार आहे.
राज्यातील सर्वच डी.एड. कॉलेज येत्या शैक्षणिक वर्षापासून बंद होणार असल्याची चर्चा विद्यार्थी व पालकांमध्ये आहे; परंतु यासंदर्भात कोणतेही शासन आदेश नाहीत. ‘नवीन शैक्षणिक धोरणात डी.एड. कॉलेज २०२८ पर्यंत चालू राहतील आणि त्यानंतर त्यांचे रूपांतर बी.एड.मध्ये करण्यासाठी संधी दिली जाणार आहे. याचा अर्थ डी.एड. कॉलेज बंद होतील, असा चुकीचा घेतला गेला आहे’, असे पुणे येथील महाराष्ट्र राज्य शैक्षणिक व संशोधन परिषदेच्या उपसंचालक माधुरी सावरकर यांनी यापूर्वीच स्पष्ट केले आहे, अशी माहिती जळगाव जिल्हा डाएटचे प्राचार्य अनिल झोपे यांनी दिली.
केसीई शिक्षणशास्त्र व शारीरिक शिक्षणशास्त्र महाविद्यालयाचे प्राचार्य अशोक राणे यांनी जळगाव जिल्ह्यात डी.एड.ची १२ महाविद्यालये आहेत. त्यासाठी इयत्ता १२ वीच्या निकालानंतर नोंदणी होते, अशी माहिती दिली. डी.एड. कॉलेज बंद करण्यासंदर्भात शासनाचे कोणतेही आदेश नाहीत, असेही राणे यांनी सांगितले.
बी.एड. चार वर्षांचे
नवीन शैक्षणिक धोरणात बी.एड.च्या अनुषंगाने मोठे बदल सुचविण्यात आले आहेत. त्यानुसार बारावी उत्तीर्णांना बी.एस्सी. बी.एड., बी.ए., बी.एड. आणि बी.कॉम., बी.एड. हा चार वर्षांचा इंटिग्रेटेड कोर्स करता येणार आहे. सुरुवातीला शासकीय कॉलेजमध्ये हे अभ्यासक्रम असतील. खासगी किंवा अनुदानित शिक्षण संस्थांना अजून परवानगी मिळालेली नाही. जळगाव जिल्ह्यात शासकीय कॉलेज नाही. उमविच्या कार्यक्षेत्रात बी.एड.चे २८ कॉलेज असून, १६०० विद्यार्थीसंख्या आहे. दोन वर्षांचे बी.एड. २०३० पर्यंत सुरू राहणार आहे, असेही प्राचार्य अशोक राणे यांनी सांगितले.
बी.एड.साठी आजपासून सीईटी…
जळगाव जिल्ह्यातील रायसोनी कॉलेज, केसीई आयएमआर कॉलेज, गोदावरी इंजिनिअरिंग कॉलेज आणि पाळधी येथील केंद्रांवर बी.एड.साठी सीईटी परीक्षा आयोजित करण्यात आली आहे. दि. २३ ते दि. २५ एप्रिलदरम्यान ही परीक्षा आहे. परीक्षेच्या निकालाची तारीखनंतर जाहीर केली जाणार आहे.
म्हणून डी.एड. मागे पडले…
गेल्या काही वर्षांत डी.एड.ला विद्यार्थ्यांचे प्रवेश कमी होण्याची कारणे वेगवेगळी आहेत. आठ ते नऊ वर्षांत नवीन शिक्षकांची भरती झालेली नाही. अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन लांबत गेले. टीईटी परीक्षा, अभियोग्यता चाचणी यामुळे डी.एड.कडे असलेला कल कमी होत गेला. जळगाव जिल्ह्यात पूर्वी डी.एड.ची ३४ महाविद्यालये होती. नंतर काही बंद झाली, तर काही ठिकाणी विद्यार्थीसंख्या कमी झाली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button