आर्थिकमहाराष्ट्रविशेषशैक्षणिकसामाजिक

राज्यात पहिलाच प्रयोग! झेडपीतर्फे १०० गावांमध्ये LKG, UKGचे वर्ग; प्राथमिक शिक्षकांच्या जोडीला कंत्राटी शिक्षक…..

सोलापूर : ग्रामीण भागातील पालकांचा इंग्रजी माध्यमांच्या शाळांकडे वाढलेला ओढा आणि जिल्हा परिषद शाळांची घटलेली पटसंख्या, याचा विचार करून आता जिल्ह्यातील १०० गावांमध्ये जिल्हा परिषदेतर्फे मोफत एलकेजी, युकेजीचे वर्ग सुरू करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांनी घेतला आहे.


त्यामुळे आता चिमुकल्यांना आता इंग्रजी माध्यमांच्या शाळांमध्ये प्रवेश न घेता गावातच जिल्हा परिषद शाळांतर्फे ‘इंग्रजी’चे धडे दिले जाणार आहेत.
शहराप्रमाणेच आता ग्रामीण भागातही इंग्रजी माध्यमांकडे पालकांचा कल वाढल्याचे चित्र आहे. या पार्श्वभूमीवर ग्रामीण भागातील चिमुकल्यांना त्यांच्याच गावात एलकेजी, युकेजीचे मोफत शिक्षण मिळावे, यासाठी जिल्हा परिषदेच्या माध्यमातून प्रयत्न केले जाणार आहेत.
दहा ते १५ हजार लोकसंख्येच्या जिल्ह्यातील १०० गावांमध्ये पहिल्या टप्प्यात हे शिक्षण सुरु केले जाणार आहे. अंगणवाड्यांमध्ये मुलांचे पोषण, आरोग्य, बालसंगोपन, यालाच प्राधान्य दिले जाते. अंगणवाड्यांसह इतर मुलांना आता जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये एलकेजी, युकेजीच्या वर्गातून इंग्रजीचे पायाभूत शिक्षण दिले जाणार आहे. त्याचा कृती आराखडा तयार करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू करण्यात आले आहे. असा प्रयोग करणारी सोलापूर जिल्हा परिषद राज्यातील पहिलीच असणार आहे.


जिल्हा परिषदेच्या शाळांमधील शिक्षकांना विशेषत: इंग्रजी विषयाच्या किंवा विज्ञान शाखेतील शिक्षकांना एक-दीड तास अगोदर शाळेवर यावे लागणार आहे. दुसरीकडे आवश्यक ठिकाणी मानधनावर कंत्राटी शिक्षक सुद्धा नेमले जाणार आहेत.
कंत्राटी शिक्षकांना मिळणार मानधन
ज्या गावांमध्ये एलकेजी, युकेजीसाठी विद्यार्थी जास्त असतील, तेथे कंत्राटी तत्त्वावर शिक्षक विशेषत: महिला शिक्षक नेमला जाणार आहे. दरमहा १५ हजारांपर्यंत त्यांना मानधन दिले जाणार आहे. तो खर्च ग्रामपंचायत निधी, वित्त आयोगातील शिक्षणासाठी राखीव ठेवलेला निधी, शालेय शिक्षण समित्यांकडील निधी, जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाकडील निधी, सीएसआर फंड किंवा झेडपीच्या सेस फंडातून केला जाणार आहे. दररोज सकाळी दोन-तीन तास त्या चिमुकल्यांना अंगणवाडी किंवा झेडपीच्या शाळांमध्ये अंक व अक्षर ओळख, उजळणी, चौदाखडी, एबीसीडी असे पायाभूत शिक्षण दिले जाणार आहे.


पहिल्या टप्प्यात १०० शाळांमध्ये सुरवात
एलकेजी, युकेजीचा अभ्यासक्रम आता शासनाने निश्चित केला आहे. जिल्हा परिषदेतर्फे जिल्ह्यातील दहा हजार लोकसंख्येच्या १०० गावांमध्ये प्रायोगिक तत्त्वावर एलकेजी, युकेजीचे वर्ग सुरु केले जातील. त्यानंतर टप्प्याटप्प्याने इतर गावांमध्येही तसा प्रयोग होईल. त्यातून ग्रामीण भागातील पालकांची आर्थिक बचत होईल आणि जिल्हा परिषद शाळांची पटसंख्या सुद्धा वाढेल.
– दिलीप स्वामी, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, सोलापूर
मुलांना मिळणार ‘इंग्रजी’चे शिक्षण


इंग्रजी माध्यमांच्या शाळांमध्ये जो अभ्यासक्रम एलकेजी, युकेजीच्या वर्गाला शिकवला जातो, तोच अभ्यासक्रम आता जिल्हा परिषदेचे शिक्षक १०० गावातील चिमुकल्यांना शिकवतील. जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये इयत्ता पहिलीला येणाऱ्या मुलांचा शैक्षणिक पाया मजबूत व्हावा, हातावरील पोट असलेल्या पालकांच्या मुलांना इंग्रजी शाळांप्रमाणेच मोफत शिक्षण मिळावे, यादृष्टीने मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांनी नियोजन केले आहे. त्यातून पालकांवर कोणताही आर्थिक भुर्दंड येणार नाही. घराजवळच मुलांना झेडपीतर्फे इंग्रजीचे शिक्षण उपलब्ध होणार आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button