निर्णय झाला, वितरण कधी ? शालेय विद्यार्थ्यांसाठी एक रंग – एक गणवेश…

मुबंई :राज्यातील सरकारी शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठीचा गणवेश कधीपर्यंत अंतिम होऊन कधी शाळेत पोहचणार असा प्रश्न शिक्षक आणि मुख्याध्यापकांना पडला आहे.

राज्यभरातील सरकारी शाळेत एकाच रंगातला गणवेश देण्याचा निर्णय सरकारनं घेतला आहे. मात्र, १५ जूनपासून शाळा सुरू होणार असल्याने गणवेशांच्या वितरणाबाबत तांत्रिक अडचणींमुळे संभ्रमावस्था निर्माण झाली आहे.
यावर्षी १५ जूनपासून नवीन शैक्षणिक वर्ष सुरु होणार आहे. राज्याच्या शिक्षण विभागाने त्याची तयारी आत्तापासून सुरु केली आहे. जिल्हा परिषद आणि अनुदानित शाळांतील विद्यार्थ्यांसाठी शाळा सुरु होण्यापूर्वीच शाळांपर्यंत पुस्तके पोहोचतील यासाठी नियाेजन करण्यात आले आहे.

राज्यातील सरकारी शाळेतील मुलांना यावर्षीपासून एक रंग एक गणवेश देण्याचा निर्णय घेतला आहे. शाळा सुरु हाेण्यास महिन्यापेक्षा कमी कालावधी शिल्लक असताना गणवेश कधी मिळणार ? कोण देणार ? यावर अद्याप विचार विनिमय सुरू आहे.

यासंदर्भात शिक्षण विभागाला अद्याप कोणत्याही सूचना देण्यात आलेल्या नाहीत. राज्यभरासाठी वितरकाकडून गणवेश घेण्यात येणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांचे माप कसे घेतले जाणार असा प्रश्न देखील उपस्थित होत आहे.
