महाराष्ट्रविशेषशैक्षणिकसामाजिक

मुख्याध्यापकांवर होणार कारवाई! दाखला नसलेल्या विद्यार्थ्यांना मिळणार आठवीपर्यंत वयानुरूप प्रवेश….

सोलापूर : विद्यार्थ्यांकडे दाखला किंवा अन्य कागदपत्रे नसल्यास त्याला वयानुरूप (इयत्ता आठवीपर्यंत) प्रवेश द्यावा, असे आदेश शालेय शिक्षण विभागाने काढले आहेत. बऱ्याच शाळा पूर्वीचे शैक्षणिक शुल्क न भरल्याने दाखला देत नसल्याच्या तक्रारी शिक्षण विभागाला प्राप्त झाल्या आहेत.


शाळा सोडल्याचा दाखला न देण्याच्या कारणावरून विद्यार्थ्याचे शैक्षणिक नुकसान झाल्यास संबंधित शाळेच्या मुख्याध्यापकावर कारवाई करण्याचा इशारा शिक्षण विभागाने दिला आहे.
इंग्रजी माध्यमांच्या शाळांमध्ये प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या राज्यभरात ४८ लाखांपर्यंत आहे. कोरोनाच्या काळात दोन वर्षांपर्यंत शाळा बंद राहिल्याने तत्कालीन शैक्षणिक वर्षांची शालेय फी अद्याप भरलेली नाही. सन २०२२-२३ या शैक्षणिक वर्षातील शुल्क देखील पूर्णपणे भरलेले नाही.अशात आता काही पालकांना त्यांच्या पाल्यास अन्य शाळांमध्ये प्रवेश घ्यायचा आहे. पण, पूर्वीची प्रलंबित फी भरल्याशिवाय शाळा सोडल्याचा दाखला मिळणार नाही, अशी भूमिका काही शाळांनी घेतली आहे.
त्यामुळे पालकांनी शिक्षणाधिकाऱ्यांसह शिक्षण संचालकांपर्यंत तक्रारी केल्या आहेत. मात्र, ठोस मार्ग निघाला नसल्याने पालकांना मुलांच्या प्रवेशाची चिंता सतावू लागली आहे. त्यावर आता शालेय शिक्षण विभागाने संबंधित शाळांच्या मुख्यापकांनाच जबाबदार धरून ‘आरटीई’ ॲक्टनुसार कारवाईचा इशारा दिला आहे. त्यामुळे आता तरी मुलांचे दाखले मिळतील, अशी आशा पालकांना आहे.


तर मुख्याध्यापकांवर होईल कारवाई
शासन निर्णयाप्रमाणे आठवीपर्यंत विद्यार्थ्यांना वयानुरूप प्रवेश देता येतो. कोणत्याही शाळांनी नियमांचे उल्लंघन करू नये. मागील वर्षीचे शैक्षणिक शुल्क भरलेले नाही म्हणून काही शाळा दाखला देत नसल्याच्या तक्रारी प्राप्त होत आहेत. पण, शुल्कामुळे विद्यार्थ्याचे नुकसान होणार नाही, याची खबरदारी मुख्याध्यापकांनी घ्यावी, अन्यथा संबंधितांवर कारवाई केली जाईल.
– हनुमंत जाधवर, प्रशासनाधिकारी, सोलापूर महापालिका
…मुख्याध्यापक म्हणतात, त्या मुलांना प्रवेश द्यायचा कसा?
मुलांनी एखाद्या शाळेत प्रवेश घेतल्यानंतर किमान तीन महिन्यांत आधारकार्ड व दाखला देणे आवश्यक आहे. पण, बऱ्याच मुलांकडून आधारकार्ड वेळेत दिले जात नाही. दुसरीकडे त्यांचा दाखला देखील समोरील शाळा वेळेत देत नाही. दुसऱ्या शाळांना पत्र पाठवून दाखल्याची मागणी करूनही त्याला दाद मिळत नाही. अशावेळी आम्ही त्या मुलांना प्रवेश द्यायचा कसा, हा खरा प्रश्न समोरील शाळेच्या मुख्याध्यापकांसमोर आहे. त्या मुलाचे नाव पूर्वीच्याच शाळेत असल्याची नोंद ‘सरल’ पोर्टलवर असते. त्यामुळे संबंधित विद्यार्थी आणि प्रवेश घेत असलेल्या शाळेच्या मुख्याध्यापकांची मोठी पंचाईत होत असल्याची वस्तुस्थिती आहे.


१५ जूनपासून शाळा सुरू होणार
२०२३-२४ या शैक्षणिक वर्षातील शाळा १५ जूनपासून सुरु होणार आहेत. पहिली ते सातवीपर्यंतचे प्रवेश साधारणतः: सप्टेंबरपर्यंत होतात. पण, अनेक पालकांना आता आपल्या मुलांची शाळा बदलायची आहे. तरीसुद्धा काही शाळा दाखला देत नाहीत. अशावेळी आता मुलाचे शैक्षणिक नुकसान होणार नाही, याची दक्षता मुख्याध्यापकांनी घ्यावी, असे शालेय शिक्षण विभागाचे संचालक शरद गोसावी यांनी स्पष्ट केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button