महाराष्ट्रविशेषसामाजिक

वामन मेश्रामांसह हजारावर कार्यकर्ते ताब्यात, उत्तर नागपूरला छावणीचे स्वरुप…

नागपूर : भारत मुक्ती मोर्चाच्या गुरुवारी होऊ घातलेल्या सभेला न्यायालयाने परवानगी नकारल्यानंतरसुद्धा हजारोच्या संख्येने कार्यकर्ते शहरात गोळा झाले. परिस्थिती चिघळू नये यासाठी पोलिसांनी मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष वामन मेश्राम आणि त्यांच्या हजारांवर कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले. यामुळे इंदोरा परिसरात काही काळासाठी तणाव निर्माण झाला. मात्र, पोलिसांनी मेश्रामांना सूचनापत्र देऊन सोडले. तसेच न्यायालयाची परवानगी मिळेस्तोवर महारॅली आणि सभेचा कार्यक्रम स्थगित करण्यात येत असून कार्यकर्त्यांनी संयम बाळगावा, असे आवाहन मेश्राम यांनी फेसबूकच्या माध्यमातून केले, त्यानंतर तणाव निवळला.
काही दिवसांपूर्वी वामन मेश्राम यांचा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यालयावर मोर्चा काढण्याबाबतचा एक व्हिडिओ समाज माध्यमांवर व्हायरल झाला. मेश्रामांनी पोलिसांकडे या महारॅलीसाठी परवानगी मागितली होती. मात्र, धम्मचक्र प्रवर्तन दिनामुळे होणारी गर्दी लक्षात घेत पोलिसांनी परवानगी नाकारली होती. संघटनेने न्यायालयात धाव घेतली. मात्र, न्यायालयाने परवानगी नाकारली. तरीसुद्धा पुढील तारखांना सभा घेण्यासाठी रितसर अर्ज करण्याची मुभाही दिली होती.

सुरुवातीच्या आवाहनानुसार, आज सकाळी १० वाजता पासून या परिसरात देशभरातून संघटनेचे कार्यकर्ते इंदोरा परिसरात पोहचू लागले. पोलिसांनीसुद्धा मेश्राम यांना सकाळीच ताब्यात घेतले होते. कार्यकर्त्यांनी ही माहिती मिळताच, त्यांनी परिसरात घोषणाबाजीला सुरुवात केली. त्यामुळे बारा ते एक वाजताच्या सुमारास इंदोरा परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

अखेर, पोलिसांनी आवाहनानंतर परिसरात कलम १४४ लागू केले. इंदोरा व बेझनबाग परिसरात येणाऱ्यांना जमावबंदी कायद्या अंतर्गंत ताब्यात घेतले गेले. त्यांना गिट्टीखदान येथील अलंकार सभागृहात नेण्यात आले. यानंतर एका व्हिडिओच्या माध्यमातून वामन मेश्राम यांनी कायद्याच्या चौकटीत राहून आंदोलन करण्यात येत असल्याचे सांगून आंदोलन रद्द करण्याची माहिती दिली. पुढे मेश्रामांना सूचनापत्र देत सोडण्यात आले. यावेळी अतिरिक्त पोलिस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी यांच्यासह पोलिस उपायुक्त सारंग आव्हाड, बसवराज तेली यांच्यसह सर्व शाखांचे वरिष्ठ पोलिस निरीक्षकांसह राज्य राखीव दलाची तुकडी, जलद कृती दल (क्युआरटी) आणि मोठ्या प्रमाणात पोलिसांना ताफा घटनास्थळी लावण्यात आला होता.

संघ मुख्यालयाला सुरक्षा कवच

समाज माध्यमांवर सुरुवातीला व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे पोलिसांनी खबरदारी घेतली होती. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यालयावर मोर्चा नेला जाईल, असा इशारा देण्यात आला होता. त्यामुळे पोलिसांनी महालातील संघ मुख्यालयाच्या परिसरात सुरक्षा व्यवस्था लावली होती. यावेळी संघ कार्यालयाच्या दिशेने येणारे सर्व मार्ग बंद करण्यात आले होते. याशिवाय येणाऱ्या जाणाऱ्यांची तपासणी केल्या जात होती.

नागपुरातील RSSच्या मुख्यालयाला घेराव घालण्याचा जमावाचा प्रयत्न, परिसरात कलम १४४ लागू

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button