
नवी दिल्ली :आज देशभरात ऐतिहासिक क्षण आहे. कारण आज दिल्लीत लोकशाहीचे नवीन मंदिर उभे राहीले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज (रविवार, २८ मे २०२३) रोजी देशाचे नवीन संसद भवन राष्ट्राला समर्पित केले.

मोदी सरकारने अत्यंत कमी कालावधीत नवीन संसद भवनाचे काम पूर्ण केले. नवीन इमारतीत लोकसभेतील 888 आणि राज्यसभेतील ३८४ सदस्यांसाठी आसनव्यवस्था आहे.

देशाचे नवे संसदभवन सर्वार्थाने वेगळे ठरणार आहे. वास्तुशास्त्राचा एक अनोखा अविष्कार येथे पाहायला मिळेल. देशाच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या विविध वस्तू आणि सामग्रींनी मिळून हे नवे भवन तयार झाले असल्याने त्यामध्ये संपूर्ण भारताचे प्रतिबिंब पाहायला मिळेल. अभियंते, प्रशासकीय अधिकारी आणि कामगार तसेच कारागिरांनी विक्रमी वेळेमध्ये वास्तूच्या उभारणीचे काम पूर्ण केले आहे.
अशोकचक्र –
अशोकस्तंभासाठीच्या उभारणीची सामग्री ही महाराष्ट्रातील औरंगाबाद आणि राजस्थानातील जयपूर येथून मागवण्यात आली होती. लोकसभा आणि राज्यसभेच्या महाकाय भिंतींवर आणि संसदेच्या बाहेर लावण्यात आलेले अशोकचक्र खास इंदूरमधून मागविण्यात आले आहे. दगडांचे कोरीव काम आबू रोड आणि उदयपूर येथील मूर्तिकारांनी केले आहे. हे दगड राजस्थानातील कोटपूतली येथून आणण्यात आले आहेत. खास बांधकामासाठी तयार करण्यात आलेल्या विटा हरियाणा आणि उत्तरप्रदेशातून मागविण्यात आल्या आहेत.

सगळ्या देशाचे प्रतिबिंब
नव्या संसद भवनामध्ये देशाची झलक पाहायला मिळेल. सभागृहातील जमिनीवर बांबूचे आच्छादन टाकण्यात आले असून त्यावरील वस्त्रप्रावरण हे मिर्झापूरमध्ये तयार करण्यात आलेले आहे. विविध ठिकाणांवर रंगरंगोटीसाठी वापरण्यात आलेले लाल आणि पांढऱ्या रंगाचे खडे राजस्थानातील सरमथुरा येथून आणण्यात आले आहेत. बांधकामाची वाळू चरखी दादरी येथून आणण्यात आली असून सभागृहातील अंतर्गत सजावटीसाठीचे सागवान लाकूड नागपूरहून मागविण्यात आले आहे.

मुंबईत तयार झाले फर्निचर
संसदभवनाच्या निर्मितीमध्ये वापरण्यात आलेला केशरी हिरव्या रंगाचा दगड उदयपूर येथून, लाल ग्रॅनाईट अजमेरजवळील लाखा येथून तर पांढऱ्या रंगाचे संगमरवर राजस्थानच्या अंबाजी येथून आणण्यात आले आहे. लोकसभा आणि राज्यसभा या दोन्ही सभागृहांतील सीलिंगसाठी वापरण्यात आलेले स्टील दमण आणि दीव येथून आणण्यात आले आहे. संसदेतील सगळे फर्निचर मुंबईत तयार करण्यात आले आहे. दगडांच्या जाळ्यांची कामे राजस्थानचे राजनगर आणि नोएडा येथे करण्यात आली आहेत.
