महाराष्ट्रविशेषशैक्षणिकसंपादकीयसामाजिक

स्वातंत्र्य दिन : भारताचा सध्याचा राष्ट्रध्वज कसा तयार झाला? आधीचे 5 ध्वज कसे होते?

भारताच्या तिरंगा झेंड्यातला सगळ्यांत वरचा केशरी पट्टा हा शौर्य आणि त्यागाचं प्रतीक आहे, मधला पांढरा पट्टा शांती आणि सत्याचं प्रतीक आहे, त्यावर असलेलं निळ्या रंगाचं धर्मचक्र गतीचं द्योतक आहे आणि हिरवा रंग सुजलाम-सुफलाम ऐश्वर्याचं प्रतीक आहे.”
शाळेत असताना आपण सगळेच जण भारताच्या तिरंगी ध्वजाबद्दल हे शिकलोय. पण आज दिसणारा तिरंगा ध्वज येण्यापूर्वी, भारताने 5 ध्वज पाहिले. पारतंत्र्यापासून ते स्वतंत्र भारत अस्तित्वात येईपर्यंत भारताचे झेंडे कसे बदलत गेले तो प्रवास आपण पाहणार आहोत.
1) 1906, कलकत्ता
1906 साली स्वीकारलेला तिरंगी ध्वज भारताचा पहिला झेंडा मानला जातो. 7 ऑगस्ट 1906 ला तत्कालीन कलकत्त्याच्या पारसी बागान स्क्वेअरमध्ये हा झेंडा फडकवला गेला.

लाल, पिवळा आणि हिरवा असे तीन रंगाचे तीन पट्टे, मध्यभागी वंदे मातरम् हे शब्द आणि लाल पट्ट्यावर चंद्र-सूर्य तर हिरव्या पट्ट्यावर 8 कमळं असा हा झेंडा होता.
2) 1907, जर्मनी
भारताचा दुसरा झेंडा मादाम भिकाजी कामांनी जर्मनीच्या स्टुटगार्टमध्ये 1907 साली झालेल्या आंतरराष्ट्रीय समाजवादी परिषदेत फडकवला होता. मादाम कामा या भारताबाहेर राहून भारतातील ब्रिटीश राजवटीविरोधात काम करणाऱ्या कार्यकर्त्यांपैकी एक होत्या.

1936 साली त्या भारतात परत आल्या तेव्हा त्यांनी हा ध्वज भारतात परत आणला. या झेंड्याचा वरचा पट्टा हिरवा, मधला पट्टा पिवळा तर खालचा पट्टा केशरी होता.
केशरी पट्ट्यावर चंद्र आणि सूर्य होते, तर हिरव्या पट्टयावर 8 तारे होते जे भारताच्या तेव्हाच्या आठ प्रांतांचं प्रतीक मानले जात. पहिल्या ध्वजाप्रमाणेच मधल्या पट्ट्यावरही ‘वंदे मातरं’ ही अक्षरं होती.


3) 1917, होमरूल चळवळीनंतरचा झेंडा
1917 साली लोकमान्य टिळक आणि डॉ. अॅनी बेझंट यांनी सुरू केलेली होमरुल चळवळ वेग घेत होती. याच चळवळीदरम्यान या दोन नेत्यांनी भारताचा तिसरा झेंडा फडकवला. या झेंड्यावरचे रंग आणि पट्टे काहीसे बदलले होते. या झेंड्यावर पाच लाल आणि चार हिरवे पट्टे एका आड एक या पद्धतीने होते.
यापूर्वीच्या झेंड्यांप्रमाणे यावर कमळं नव्हती, उलट यावर 7 तारे होते, हे सात तारे आकाशात दिसणाऱ्या सप्तर्षींच्या आकृतीप्रमाणेच झेंड्यावरही काढले होते. 1918 साली लोकमान्य टिळकांनी होमरूलच्या काही स्वयंसेवकांबरोबर हा झेंडा हाती घेतलेला फोटोत पाहायला मिळतो.

4) 1921, आंध्र प्रदेश
1885 साली भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना झाली होती आणि 1920 सालापर्यंत आधी टिळक आणि नंतर महात्मा गांधींच्या नेतृत्वात भारताच्या स्वातंत्र्याची मागणी जोर धरत होती.
1921 साली आंध्र प्रदेशातील बेझवाडा म्हणजे सध्याच्या विजयवाडामध्ये काँग्रेसचं अधिवेशन झालं. पिंगली व्यंकय्या या काँग्रेस कार्यकर्त्याने एक झेंडा तयार करून तो महात्मा गांधींना दाखवला. पिंगली व्यंकय्या हे आफ्रिकेत ब्रिटीश लष्करात होते तेव्हा त्यांची आणि गांधींची भेट झाली होती.
पिंगली व्यंकय्या यांनी तयार केलेल्या झेंड्यात लाल आणि हिरवे असे दोनच रंगांचे पट्टे होते. हिंदू आणि मुस्लीम या दोन धर्मांचं ते प्रतीक होतं. गांधीजींनी इतर सर्व धर्मांचं प्रतिनिधित्व करण्यासाठी यात पांढऱ्या रंगाचा पट्टा समाविष्ट करायला सांगितला आणि देशाची प्रगती दाखवण्यासाठी चरख्याचं चिन्हही या झेंड्यात घेतलं गेलं.
1923 साली मे महिन्यात नागपूरमध्ये ब्रिटीश सत्तेविरोधात शांततामय मोर्चे निघाले, यावेळी हजारो मोर्चेकरी हा झेंडा घेऊन चालत होते. यावेळी शेकडो निदर्शकांना अटक केली गेली होती.

5) 1931, तिरंगी झेंडा आणि चरखा
एव्हाना भारताच्या स्वातंत्र्यलढ्याचं नेतृत्व पूर्णपणे काँग्रेसकडे होतं. 1929 साली काँग्रेसच्या लाहोर अधिवेशनात ‘पूर्ण स्वराज’चा ठराव संमत झाला होता. 1931 साली आज आपण पाहत असलेल्या झेंड्यात असलेली रंगांची रचना अस्तित्वात आली.
काँग्रेस पक्षाने केशरी, पांढरा आणि हिरवे पट्टे असलेला आणि त्यावर मध्यभागी चरखा असलेला झेंडा एक ठराव संमत करून स्वीकारला. हाच काँग्रेस पक्षाचाही झेंडा होता.
आतापर्यंत झेंड्यातील रंगांकडे विविध धर्मांचं आणि गटांचं प्रतीक म्हणून पाहिलं जात होतं. पण या ठरावाने या रंगांचा धर्मांशी असलेला अर्थ काढून टाकला.

6) 1947, आजचा तिरंगा
1947 साली घटना समिती स्वतंत्र भारताच्या कारभारासाठीचा व्यापक आराखडा तयार करत होती. स्वतंत्र भारताचा झेंडा कसा असावा हा प्रश्नही घटना समितीत चर्चेला आला होता. 1931 साली स्वीकृत झालेला झेंडा या समितीने फक्त एक बदल करून स्वीकारला. चरख्याच्या जागी सारनाथच्या अशोकस्तंभावर असलेलं धर्मचक्र आलं.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button