महाराष्ट्रसामाजिक

न्याय देता का न्याय,एका सेवानिवृत्त अधिकाऱ्यांवर आली वाईट वेळ, पोलीस ठाण्यातून कागदपत्रे गायब, आरोपी मोकाट.

नवी मुंबई, दि.8. (सुरेश नंदिरे ) न्याय देता का न्याय अशी वाईट वेळ एका सेवानिवृत्त अधिकाऱ्यावर आले आहे. जादूटोणा करणाऱ्या सातजणांच्या एका टोळीने वाशीत राहणाऱ्या या अधिकाऱ्याला फसविले असून लाखो रुपयांचे दागिने घेऊन ते पसार झाले आहेत.वाशी पोलिसांनी तब्बल दोन महिन्याच्या कालावधीनंतर गुन्हा दाखल करून घेतला. त्यासाठी या अधिकाऱ्याला सहाय्यक पोलीस आयुक्तांपासून ते आयुक्तानं पर्यंत सर्वांचे उंबरटे झीजवावे लागले. मात्र अद्यापही त्यांना न्याय मिळालेला नाही.

वाशी येथे राहणारे पवार हे ज्येष्ठ सेवानिवृत्त अधिकारी आहेत. त्यांच्या पत्नीसह ते वाशी येथे राहतात. 23 सप्टेंबर रोजी अर्धांगवायूचा झटका आल्याने त्यांच्या पत्नीला नजीकच्या माधव रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. याबाबतची माहिती मिळताच गावी गेलेले पवार आणि कामोठ्याला राहणाऱ्या त्यांच्या मुलीने रुग्णालयात धाव घेतली. त्यानंतर त्यांनी घरी जाऊन पाहणी केली असता, घरातील सामान अस्तव्यस्त पडलेले दिसले तर लाकडी कपाट तोडल्याचे त्यांच्या लक्षात आले. शिवाय देवघराजवळ काळ्या बाहुलीला सुया टोचून पूजा केल्याचे त्यांना दिसले. बाजूलाच ठेवलेली एक वही सापडली. त्यामध्ये पवार यांच्या पत्नीने गेल्या आठ महिन्यातील रोजनिशी लिहिल्याचे दिसले. ते वाचल्यावर सर्व भयंकर प्रकार त्यांच्या लक्षात आला. याबाबत त्यांनी वाशी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक चांदेकर यांना भेटून सविस्तर माहिती दिली. त्यावर त्यांनी सांगितले की गणपती विसर्जन झाल्यानंतर 30 सप्टेंबरला तुम्ही लेखी तक्रार द्या आम्ही गुन्हा दाखल करून घेऊ. यादरम्यान आरोपी निलेश हातवळणे व त्याच्या सहकाऱ्यांनी दिनक्रम लिहिलेले वही मिळावी म्हणून हॉस्पिटलमध्ये घुसण्याचा प्रयत्न केला तर पवार यांच्या मुलीला व जावयाला मारण्याचा प्रयत्न केला. याबाबत 27 सप्टेंबर रोजी वाशी पोलीस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला.

30 सप्टेंबरला पवार यांनी लेखी तक्रार दिल्यानंतर पोलीस उपनिरीक्षक कृष्णा कुटे यांना या प्रकरणाचा तपास करण्यास सांगितला. मात्र कुटे यांनी गुन्हा दाखल न करता तपासाच्या नावाखाली वेळ काढण्यास सुरुवात केली. पवार यांचा जबाब 11 ऑक्टोबरला घेतल्यानंतर आरोपीला बोलवण्यात आले. मात्र आरोपीने आपल्याला आता वेळ नसून नवरात्र उत्सव संपल्यानंतर 25 ऑक्टोबरला आपण हजर राहू शिवाय पवार यांचे दागिने व पैसे आपण घेतले असून ते आणून देतो असे सांगितले. त्यानंतर 26 ऑक्टोबर रोजी आरोपी पोलीस ठाण्यात हजर झाला. कुटे यांनी आरोपीचा जबाब घेऊन त्याला पाठवून दिले. त्या वेळी आरोपीने दागिने व पैसे का आणले की नाही हा मोठा प्रश्नच आहे. हा तपास चालू असतानाच कुटे यांच्यावर एका दुसऱ्याच प्रकरणात पैसे घेतल्याचा आरोप झाल्याने त्यांना निलंबित करण्यात आले. त्यानंतर हा तपास पोलीस उपनिरीक्षक शेडगे यांच्याकडे देण्यात आला. त्यानंतरही एफआयआर दाखल करून घेतला नाही. पोलीस वारंवार काही ना काही कारण सांगून तक्रारदाराला मानसिक त्रास होईल असे काम करीत राहिले. यावर तक्रारदाराने सहाय्यक पोलीस आयुक्त, पोलीस उपायुक्त पानसरे व नवी मुंबईचे पोलीस आयुक्त मिलिंद भांबरे यांची भेट घेऊन सर्व प्रकार कथन केला. या अधिकाऱ्यांनी चांदेकर यांना गुन्हा दाखल करून घेण्याच्या सूचनाही केल्या. तरीही चांदेकर गुन्हा दाखल करून घेत नव्हते. घरात चोरी झाल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी येऊन साधा पंचनामाही केला नव्हता. त्यातच निलंबित पोलीस उपनिरीक्षक कुटे यांनी तक्रारदाराला वारंवार फोन करून हा तपास दुसऱ्या अधिकाऱ्याकडे देऊ नका मी दागिने आणि पैसे काढून देतो तुम्ही चार नोव्हेंबर पर्यंत शांत रहा. मात्र चार नोव्हेंबर, 10 नोव्हेंबर गेले तरी हाती काहीच आले नाही. मात्र तक्रारदाराचा लेखी अर्ज, जबाब आणि आरोपीचा जबाब पोलीस ठाण्यातून अचानक गायब करण्यात आला. याबाबत पुन्हा एकदा पोलीस उपायुक्त पानसरे यांना भेटून गुन्हा दाखल करून घेण्याबाबत विनंती करण्यात आली. शिवाय कुटे व चांदेकर यांच्याबाबत संशय निर्माण होत असून यांनी जाणीवपूर्वक गुन्हा दाखल होऊ दिला नाही. त्याबाबत चौकशी करण्याची मागणी पानसरे यांच्याकडे लेखी तक्रारी द्वारे करण्यात आली.

या दरम्यान आरोपी निलेश हातवळणे वारंवार फोन करून पवारांच्या पत्नीला धमक्या देत राहिला. तुझ्या नवऱ्याने तक्रार मागे घेतली नाही तर त्याचे परिणाम चांगले होणार नाही. याबाबतचे सर्व सीसीटीव्ही फुटेज, जादूटोणा केल्याचे फोटो, कागदपत्रे व वही अशा गोष्टी पोलिसांना पुरावे म्हणून देण्यात आले. तरीही गुन्हा दाखल करून घेतला नाही. नंतर डीसीपी ची भेट घेतल्यावर नाईलाजाने का होईना पोलिसांनी गुन्हा रजिस्टर क्रमांक 341/23,भा द वी 420, 34 महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानुष 3, जादूटोणा आणि प्रतिबंध 2 (1) नुसार निलेश हातवळणे, पत्नी अर्चना हातवळणे, सागर जेजुरकर, नानाभाऊ, विजुभाऊ, अनुसया कांबळे व भक्ती यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करून घेतला. हा तपास सध्या पोलीस निरीक्षक नाळे करीत असून अद्याप डोळ्यासमोर असलेल्या एकाही आरोपीला पोलिसांनी अटक केली नाही. उलट तक्रारदाराला सांगितले जात आहे तुम्ही पुरावे घेऊन या त्यानंतर आम्ही तपास करतो.

दरम्यान पोलिसांनी आरोपीच्या दोन्ही घराची झडती घेतली असता तक्रारदाराचे बँकेचे अनेक कागदपत्रे, पासबुक, पेन्शन बुक, एटीएम कार्ड सापडले. याशिवाय इतर कागदपत्रे, रक्कम, दागिने मिळाली नाही. आरोपीच्या घरात इतके काही सापडूनही पोलीस आरोपीला अटक करायला तयार नाहीत. सात दिवसांचा नोटीस अवधी संपल्यानंतरही आरोपी हजर राहिलेले नाहीत. एकंदरीत सुरुवातीपासूनच वाशी पोलिसांना हा गुन्हा दाखल करून घ्यायचा नव्हता. मात्र वरिष्ठांच्या दबावाखाली गुन्हा दाखल केला तर जादूटोणा गुन्याचे कलम टाकण्यासाठी टाळाटाळ केली. तक्रारदाराने यावर आक्षेप घेतल्यावर जादूटोण्याचे कलम लावण्यात आले, तर चोरीचे कलम लावण्यात आले नाही.

तक्रारदारावर करनी झाली असे सांगून करनी काढण्यासाठी लाखो रुपयांची मागणी करणारे, त्यांच्या मृत्यूचे भाकीत करणारे आणि गुप्तधन काढून देणारे आरोपी सध्या मोकाट फिरत असून वाशी पोलीस मात्र तक्रारदारांकडे पुरावे मागत आहे. त्यांना वारंवार पोलीस ठाण्यात बोलवून त्यांची चौकशी केली जात आहे. नुकत्याच एका शस्त्रक्रियेतून बाहेर आलेल्या पवार यांना डॉक्टरांनी चालण्यास बंदी घातली आहे. हे पोलिसांना माहीत असूनही पोलीस जाणीवपूर्वक त्यांना त्रास देत आहे. आरोपींना मात्र मोकळे सोडले आहे. सुरुवातीपासूनच पीएसआय कुटे यांनी आरोपी सांगेल तसे केले आहे. आताही आरोपी येतील तेव्हा चौकशी करू अशी पोलिसांची भूमिका दिसते. पवार यांनी ज्या पोलीस अधिकाऱ्यां विरोधात तक्रार केली आहे. त्यांच्याकडेच चौकशीचा अर्ज व तपास दिल्याने ह्या गोष्टी किती निपक्षपणे केल्या जातील हे महत्त्वाचे आहे. मात्र पोलिसांना या गुन्ह्याचे गांभीर्य कळले नसून वाशी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक ‘हम करे सो कायदा’ अशी भूमिका घेत आहे. ते वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या आदेशालाही मानत नाहीत. त्यामुळे हा तपास गुन्हे अन्वेषण विभागाकडे दिल्यास या प्रकरणाची चौकशी निपक्षपणे होईल असे तक्रारदारांचे म्हणणे आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button