महाराष्ट्रसंपादकीयसामाजिक

“छत्रपती शाहू महाराज आणि डॉ.बाबासाहेब आंबेडकर ऋणानुबंध…”

मानवी जीवनाच्या आधुनिकीकरणामध्ये वाफेच्या इंजिनचा जेम्स वॅटने लावलेला शोध जसा क्रांतिकारक ठरला, तसाच शाहू छत्रपतींनी डॉ. बाबासाहेबांच्या नेतृत्वाचा लावलेला शोध भारताच्या सामाजिक जीवनाला क्रांती देणारा ठरला. क्रांतिसूर्य महात्मा फुले यांच्या विचारांना शाहू महाराजांनी पुढे नेऊन चालना दिली त्याप्रमाणे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीय राज्यघटनेत महात्मा फुले आणि शाहू महाराजांच्या विचारांना कायद्यात रूपांतर केले असे म्हणणे अतिशयोक्ती होणार नाही.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याशी संबंध येण्याअगोदरच शाहू महाराजांनी अस्पृश्यता निवारणासाठी कार्य करीत होते. शिवाजी महाराजांचा गौरवशाही इतिहास छत्रपती शाहू महाराजांना लाभला असल्याने आपली छोट्याश्या राज्यात त्यांनी अनेक सुधारणावादी कार्य करून वर्षानुवर्षे चालत आलेल्या रूढी परंपरांना मातीत गाळले. शाहू महाराजांना आपल्या दीन-दुबळ्या, शोषित,पीडित समाजाच्या उन्नतीसाठी नेतृत्व करण्याच्या पुढाऱ्यांचा शोध घ्यायचा होता. कारण त्याकाळी प्रत्येक जातीचा पुढारी हा उच्चवर्णीयच असायचा..त्यामुळे उच्चवर्णीयांना सोडले तर बाकी जातीच्या लोकांची स्थिती हि जनावरांसारखी वाईट होती. पुढारी कसा असावा या बद्दल मत व्यक्त करतांना ६ सप्टेंबर १९१९ ला शिवतरकर मास्तरांना लिहलेल्या पत्रात शाहू महाराज म्हणतात की,
“आपण पुढारी असा म्हणून कोणास घेऊ नये, कारण पुढारी म्हणून घेतले तर तो आपली अंमलबजावणी करून घेनार आणि माझे न ऐकलं तर तुमचे संस्थेशी माझा संबंध राहणार नाही असे म्हणणार म्हणून आपण सल्लागार म्हणून नियुक्त करावे. पशुदेखील आपल्या जातीच्या पुढारी शिवाय दुसरा पुढारी स्वीकारत नाही मग मनुष्य जातीने का स्वीकारावा..? हरणाच्या कळपात कधी डुक्कर पुढारी नसते, किंवा डुक्करच्या कळपात हरणे पुढारी नसते..कबुतरांच्या कळपात बदके पुढारी नसतात अन् बदकाच्या कळपात कबुतरे पुढारी नसतात…मग मनुष्य जातीच्या कळपात दुसऱ्या जातीचे पुढारी का असावेत…?
पुढारीपणा घेतले तर पशु-प्राण्यांसारखी दशा होते. गायी-म्हैशीचा पुढारी हा गवळी असतो, तो लहान वासरांना/रेडकांना उपाशी ठेऊन दूध विकतो आणि चैन करतो…अशीच अवस्था आपल्या क्षत्रिय,वैश्य आणि सोमवंशिय लोकांची झालेली आहे,आपण आपल्या जातीचा पुढारी न ठेवता आपण ब्राह्मणांना पुढारीपद दिले त्यामुळे ते आमच्या जातीच्या लोकांना बैलासारखे गाडीला जोडून आम्हाला बडवितात. मोडका-तोडका आपल्याच जातीचा पुढारी असला तर ते उत्तमच पण ब्राह्मणास जर आमच्या जातीचा पुढारी बनविला तर ब्राह्मणाने रोटी-बेटी व्यवहार करायला पाहिजे तेव्हाच आपण त्यांना आमचे पुढारी मानू.
शाहू महाराजांची दीन-दुबळ्या समाजाबद्दल असलेली तळमळ वरील पत्रातून दिसून येते. हजारो वर्षे गुलामीच्या बंधनात असलेल्या समाजावर होणारा अन्याय-अत्याचार शाहू महाराजांनी बघितला होता. राजा असूनही वेदोक्ताचा प्रश्न निर्माण झाला होता. त्यामुळे मागासवर्गीय समाज आपल्या समाजव्यवस्थेत आला पाहिजे म्हणून शाहू महाराजांनी आपल्यातीलच एका पुढाऱ्याचा शोध घेत होते.. महाराजांचा हा शोध डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या रूपाने संपला. देशाच्या एकुणच जडणघडणीवर नजर टाकता डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाला टाळून पूढे जाणे अशक्य आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे भारतीय समाजाला मिळालेले एक नक्षत्रांचे देणे आहे. जगभ्रमंती, वाचन आणि व्यासंग यांचा प्रचंड मोठा आवाका, समाजव्यवस्थेची पक्की जाण आणि त्यातील बदलांचे पक्के आणि निर्णायक उपाय या सर्वांचे एकत्रीत मिश्रण म्हणजे डॉ. बाबासाहेब आंबेडकर.
आज केवळ भारत नव्हे तर, जगभरात या महामानवाने आपल्या आयुष्यात केलेल्या कार्याचा आणि लिहून ठेवलेल्या ज्ञानभांडाराचा आधार घेतला जातो. पण, कोणताही महामानव एका रात्रीत जन्माला येत नाही. त्याच्या कार्याला पाठींबा देणारे अनेक हात त्याच्यासोबत असावे लागतात. असे हात जेव्हा असा मानवास मिळतात तेव्हा, समाजात अद्भूत परिवर्तन घडते जे पूढच्या समाजाचे भविष्य असते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि राजर्षी शाहू महाराज यांची भेटही समाजाचे भविष्य ठरवणारीच. भीमराव आंबेडकर नामक व्यक्तीने उच्च पदवी प्राप्त केली हि बातमी राजर्षी शाहू महाराजांच्या कानावर येऊन पडली तेव्हा त्यांनी मुंबईत डॉ. बाबासाहेब आंबेडकर राहत असलेल्या परळ येथील चाळीत आपला प्रतिनीधी पाठवून आंबेडकरांना कोल्हापूरला यायचे निमंत्रण दिले.
दरम्यान, महाराजांचे निमंत्रण स्विकारून डॉ. बाबासाहेब आंबेडकर कोल्हापूरला आले. तेव्हा शाहू महाराजांनी बाबासाहेबांची भव्य मिरवणूक काढली. याच भव्य कार्यक्रमात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना कोल्हापूरी मानाचा “जरीपटका” बांधण्यात आला. डॉ. बाबसाहेब आंबेडकर आणि राजर्षी शाहू महाराज यांची भेट समाजपरिवर्तनाच्या दृष्टीने अत्यंत महत्वाची आणि समाजकार्याची व्याप्ती वाढवणारी ठरली. या भेटीने दोघांच्या मनात विशेष जिव्हाळा निर्माण झाला. दोघांच्या जीवनाचे उद्दीष्ट एकच होते, ते म्हणजे तळागाळातील लोकांचा विकास.
१९२० मध्ये कोल्हापूरातील माणगाव येथे दक्षिण महाराष्ट्र दलित परिषदेचे अधिवेशन झाले. हे अधिवेशन डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडले होते. विशेष म्हणजे या अधिवेशनाला प्रामुख्याने शाहू महाराज उपस्थित होते. माणगाव परिषदेत राजर्षी शाहू महाराज आपल्या भाषणात म्हणतात की, “तुम्ही तुमचा पुढारी शोधून काढलात त्याबद्दल अंतःकरणपूर्वक अभिनंदन माझी खात्री आहे की, डॉ.बाबासाहेब आंबेडकर तुमचा उद्धार केल्याशिवाय राहणार नाहीत.एक वेळ येईल की, ते सर्व हिंदुस्थानचे पुढारी होतील..!”
शाहूमहाराजांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वावर शिक्कामोर्तब केल्याने डॉ. आंबेडकरांच्या नेतृत्वाचा मार्ग सुकर झाला. तसेच, या दोन्ही महामानवातील ऋणानुबंध जास्त घट्ट होत गेला. पूढे डॉ. आंबेडकर संपूर्ण हिंदूस्थानचे नेते झाले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर नसते तर, आज दिसणाऱ्या बहुजन कुळांचा उद्धार सोडाच पण, त्यांच्या आयुष्यातील अंधार अधिकच गडद झाला असता. ज्या वेळी बाबासाहेब सामाजिक चळवळीत जास्त सक्रिय नव्हते त्यावेळी शाहू महाराजांनी बाबासाहेब यांच्यातील सक्षम नेतृत्वाचा अचूक वेध घेऊन भारतीय संविधानाचा शिल्पकार या भारत देशाला दिला होता.
या परिषदेच्या अध्यक्ष पदावरून शाहू महाराजांच्या कार्याचा गुणगौरव करतांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की, “शाहू महाराजांनी जयंती सणासारखी धुमधडाक्यात साजरी करा..!” हि असते सामाजिक कार्याची पावती. दोन्ही महापुरुषांनी एकमेकांच्या कार्याची दखल घेतली. दोघेही सामाजिक सुधारणेच्या कार्यात स्वतःला झोकून दिले होते.विशेष म्हणजे शाहू महाराजांच्या अकाली निधनानंतर सामाजिक सुधारणेची चळवळ डॉ.बाबासाहेबांनी जिवंत ठेवली.
पहिल्याच भेटीत शाहू महाराज आणि बाबासाहेब यांची चिरमैत्री जमली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी शाहू महाराजांना अस्पृश्योद्धरांसाठी निदान एका साप्ताहिकाची गरज असल्याचे प्रदिपाद करून ’मुकनायक’ हे साप्ताहिक चालवत असलो तरी आज ते आर्थिक अडचणीमुळे ’मुक’ झाल्याचे सांगितले. ’मुकनायक’ विषयी आधिक माहीती देताना डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी शाहू महाराजांना सांगितले की “आपण ३१ जानेवारी १९२० ला पहिला अंक प्रकाशित केला. या अंकावर संत तुकाराम यांचे बोधवाक्य आहे, हे बोधवाक्य असे आहे,”

  "काय करू आता धरुनिया
   भीडा नि:शंक हे तोंड वाजविले
   नव्हे जगी कोणी मुकियांचा
   जाण, सार्थक लाजुन नव्हे हित..!"

         संत तुकोबारायांचे बोधवाक्य ऐकुन महाराज एकदम प्रसन्न झाले व म्हणाले " व्वा ! व्वा ! छान ! छान !!" असे सहजच म्हणून गेले. पुढे बाबासाहेब आंबेडकरांनी महाराजांना आर्थिक अडचणीमुळे वृत्तपत्रे कशी बंद पडतात हे सांगितले. त्या काळी वृत्तपत्रांना फारश्या जाहीराती मिळत नसत. वर्गणीदारांच्या वर्गणीतुनच अंक चालवावा लागत असे तसेच वर्गणीदार आपल्या वर्गणीशी प्रामाणिक राहात नसायचे. महाराजांच्या ध्यानी सर्व बाबी आल्यानंतर तात्काळ त्यासाठी रू.२,५०० ची मदत केली. या मदतीनंतर "मुकनायक" बोलु लागला. विशेष लक्षात घेण्यासारखी गोष्ट म्हणजे त्यावेळी सोने १३ रुपये तोळे होते. यावरुन २५००/- रुपये किती मोठी रक्कम होती याची कल्पना येईल....
             डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना इंग्लडमध्ये शिक्षण घेत असतांना काटकसर करून सुद्धा पैसे कमी पडू लागले...तेव्हा ४ सप्टेंबर १९२१ रोजी लंडनहुन डॉ.बाबासाहेब  आंबेडकरांनी महाराजांना एक पत्र पाठवून मदत मागितली, ते लिहितात, "आपली प्रक्रुती उत्तम असेलच अशी आशा करतो, आपली आम्हाला खुप आवश्यकता आहे,कारण भारतात प्रगती करत असलेल्या सामाजिक लोकशाहीच्या चळवळीचे आपण एक महान आधारस्तंभ आहात, महाराजांविषयी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना किती आदर होता हे यावरून दिसून येते. डॉ.बाबासाहेबांच्या आंबेडकरांच्या विनंतीप्रमाणे त्यांना आवश्यक ती मदत केली..."
         डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणी शाहू महाराज एकमेकांचा आदर करीत याचं उत्तम उदाहरण म्हणजे दिल्ली येथे १३ व १४ फ़ेब्रुवारी १९२२ रोजी ’अखिल भारतीय बहिष्क्रुत परिषद’ आयोजित केली होती. त्या परिषदेत डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या अनुपस्थितीत त्यांच्या माघारी त्यांच्याविषयी प्रशंसा करताना शाहू महाराज म्हणाले होते की, "तुमचे अध्यक्षस्थान स्वीकारणे आणि तुमच्यासमोर भाषण करणे हा मान खरोखरीच आंबेडकरांचा आहे. ते माझ्यापेक्षा जास्त शिकलेले आहेत. यावेळी ते इंग्लंडमध्ये असल्यामुळे दुर्दैवाने ते या परिषदेस उपस्थित राहू शकले नाहीत. पण ते कोठेही असोत, अस्पृश्य वर्गाला जे दुःख होत आहे त्याची जाणीव त्यांच्या हृदयात सतत टोचत असते याची मला खात्री आहे..."
         छत्रपती शाहू महाराज अस्पृश्यता निवारणासाठी किती चिंतेत होते याचे उत्तर शाहू महाराजांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना लिहलेल्या पत्रात मिळते...शाहू महाराज लिहतात, "आजकाल अस्पृश्य लोकांचा विश्वास नाहीसा झालेला दिसतो आहे. आणि त्यातल्या त्यात विशेषतः महार लोकांचा जास्त प्रमाणात विश्वास नाहीसा झाला आहे...आपण मनुष्य आहो की पशुहीन नीच आहोत याची साधी कल्पना सुद्धा या लोकांना नाही. महार लोकांना स्वतःबद्दल आदराचा स्पर्श देखील नाही. मग त्यांच्या मनात स्वतःबद्दल आदर आणणार कसा? मला वाटते की याचे कारण असे की या लोकांचा आत्मसन्मान वाढविण्यासाठी विद्यादान करणारा कुणीही नाही. तसेच विद्यादान देण्यास कुणी तयार झाला तरी सुद्धा विद्यादान घेण्यास महार लोकांना मान्य नाही. शिरोळला मुक्कामी असतांना मी महार लोकांना बंगल्यावर बोलावून माझ्या मोटारीतून फिरायला घेऊन गेलो..पण त्यांना याचे काही नवल वाटले नाही. उलट तेच म्हणाले की, "नको नको महाराज आम्हाला जवळ बोलावू नका. महार,अस्पृश्य लोकांच्या मनात हि असली भीती कुणी निर्माण केली असेल तर तेव्हाच्या ब्राह्मणी व्यवस्थेनी...त्याकाळी असलेले जुलमी कायदे अस्पृश्य लोकांना गुलाम करून ठेवणारे होते.
      डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना शाहू महाराजांच्या कार्याचे पुरेपूर महत्व कळले होते. म्हणूनच शाहू महाराजांचे कार्य शब्दबद्ध करावे यासाठी "मूकनायक" चा विशेषांक काढण्याची योजना बाबासाहेबांनी केली. डॉ.बाबासाहेब आंबेडकर शाहू महाराज यांना पत्र लिहून म्हणतात की, माणगाव आणि नागपूर च्या परिषदेत पास झालेल्या ठरावाला लक्षात घेऊन *"२६ जून"* या दिवशी हुजुरांचा वाढदिवस साजरा करण्यात येणार आहे. तसेच आपल्या मदतीमुळे चालत असलेल्या मूकनायक चा स्पेशल अंक आपल्या नावाने काढण्याचे ठरविले आहे. तुमच्या कार्याची दखल घेऊन मुकनायकच्या "शाहू स्पेशल अंकात" आपल्या कारकिर्दीतील झालेल्या परिवर्तनवादी कार्याची माहिती शब्दबद्ध करायची आहे. तसेच हुजुर (शाहू महाराज) तुमचा एक फोटो अंकासोबत छापायला पाहिजे. तुमच्या वाढदिवसाला अगदी कमी दिवस बाकी असल्यामुळे मी आजच सायंकाळी कोल्हापूरला येण्याकरिता निघत आहे. मी स्वतः येऊन आवश्यक असलेली संपूर्ण माहिती गोळा करेल. हुजुरांच्या दर्शनाचा लाभ होईलच.
      डॉ. बाबासाहेब आंबेडकर ५ जुलै १९२० ला उच्चशिक्षणासाठी लंडनला रवाना झाले. डॉ.बाबासाहेब आंबेडकर इंग्लडमध्ये असतांना भारतात शाहू महाराजांचे दलितोद्धारक कार्य मोठ्या प्रमाणात सुरु होते. तसेच दोन्ही महापुरुषांचा पत्रव्यवहार सुरु होता. छत्रपती शाहू महाराज आणि डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्यातील नाते घट्ट होत असतांनाच ६ मे १९२२ ला शाहू महाराजांचे अकाली निधन झाले आणि या दोन्ही महामानवातील मैत्रीच्या संबंधाला विराम आला. पुढे डॉ. बाबासाहेब आंबेडकर हयात असतांना बाबासाहेब आंबेडकर यांचा पहिला पुतळा कोल्हापूर नगरीत बिंदू चौकात उभा करण्यात आला. एवढे प्रेम शाहू नगरीने डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्यावर केले. एका महामानवाचा अंत झाला आणि दुसऱ्या महामानवाच्या रूपाने शोषित,पीडित अश्या बहुजन समाजाचे नेतृत्व उभे झाले...

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button