देश-विदेशविशेषसामाजिक

उत्तर प्रदेशमध्ये मदरशांत राष्ट्रगीत अनिवार्य; सरकारतर्फे अध्यादेश जारी, अनुदानित-विनाअनुदानित सर्वाना लागू..

लखनौ : उत्तर प्रदेशमध्ये गुरुवारपासून सर्व मदरशांमध्ये राष्ट्रगीत म्हणणे अनिवार्य करण्यात आले. उत्तर प्रदेशच्या मदरशा शिक्षण मंडळाचे कुलसचिव एस. एन. पांडे यांनी तसे आदेश ९ मे रोजीच जिल्हा अल्पसंख्य कल्याण अधिकाऱ्यांना पाठवले आहेत.

२४ मार्च रोजी शिक्षण मंडळाच्या बैठकीत हा निर्णय झाला.
राज्यातील सर्व मदरशांमध्ये प्रार्थनेच्या वेळी राष्ट्रगीत म्हणणेही अनिवार्य करण्यात आले आहे. रमझानच्या सुटय़ानंतर आज १२ मे रोजी सर्व मदरशांचे नियमित वर्ग सुरू झाले. आजच हा अध्यादेशही लागू करण्यात आला. त्यात नमूद केले आहे की, येत्या शैक्षणिक सत्रापासून अनुदानप्राप्त आणि विनाअनुदानित अशा सर्व मदरशांत रोज वर्ग सुरू होण्याआधी शिक्षक आणि विद्यार्थी राष्ट्रगीत म्हणतील. या आदेशाची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी जिल्हा अल्पसंख्य अधिकाऱ्यांकडे देण्यात आली आहे.

मदरिस अरेबिया टीचर्स असोसिएशन’चे सरचिटणीस दिवान सहाब झमन खान यांनी सांगितले की, आतापर्यंत वर्ग सुरू होण्याआधी मदरशांमध्ये हमद (अल्लाहची स्तुती) आणि सलाम (मुहम्मद यांना अभिवादन) करण्यात येत असे. काही ठिकाणी राष्ट्रगीतही म्हटले जात आहे, परंतु ते अनिवार्य नव्हते. गेल्या महिन्यात अल्पसंख्य कल्याणमंत्री धरमपाल सिंग यांनी मदरशांमध्ये राष्ट्रवाद शिकवण्याची गरज प्रतिपादित केल्यानंतर हा आदेश जारी झाला आहे. अल्पसंख्य कल्याण राज्यमंत्री दानिश आझाद अन्सारी यांनीही सांगितले होते की, मदरशांमधील विद्यार्थी हे निस्सीम देशभक्त असावेत, असे सरकारला वाटते. उत्तर प्रदेशमध्ये सध्या १६ हजार ४१६ मदरशे असून, त्यापैकी ५६० मदरशांना सरकारी अनुदान मिळते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button