महाराष्ट्रसंपादकीयसामाजिक

भगव्या झेंड्याशेजारी निळा झेंडा हि दिमाखाने डोलताना दिसतो,तोंडोली गावात…

परभणी ;(अरविंद भराडे )आजकाल भोंगा, नमाज, हनुमान चालिसा, हिजाब असे मुद्दे काढून समाजातील वातावरण कलुषित करण्याचे प्रयत्न होत आहेत. माणसांना जाती-धर्माच्या नावाखाली झुंजवण्याचे कटकारस्थान रचले जात आहे. मात्र, ग्रामीण भागातील नागरिक अशा कारस्थानांना फारशी भीक घालत नाही. जालना ते भोकरदन या मार्गावर असलेल्या तोंडोळी या छोट्याशा गावात अशा निरर्थक आणि माणसांमाणसांत फुट पाडणाऱ्या गोष्टींना अजिबात थारा नाही, याची प्रचिती आली. येथे विविध जाती-धर्माचे लोक खूप गुण्यागोविंदाने नांदतात. सामाजिक सलोखा कसा राखला जाऊ शकतो, याचा आदर्श म्हणजे तोंडोळी हे गाव आहे.
भोकरदन आणि जाफराबाद तालुक्याच्या सीमेवर तोंडोळी हे गाव आहे. जालना शहरापासून ३५ किमी अंतरावर असलेलं हे गाव साधारण ८०० लोकवस्तीचं आहे. ते अनेक अर्थांनी आगळवेगळं आहे. एक गाव एक विहीर, तंटामुक्त गाव, हागणदारी मुक्त गाव, दारूविक्री बंदी आहे. गावात कोणत्याही राजकीय पक्षाची पाटी तुम्हाला दिसणार नाही. सुशिक्षतांचे प्रमाणही मोठे आहे. १९६४ ला स्थापन झालेली इयत्ता चौथीपर्यंतची सरकारी शाळा आहे. प्राथमिक आरोग्य केंद्र आहे. गावाने आजवर अनेक नामांकित प्राध्यापक, वकील, न्यायाधीश, अधिकारी दिले आहेत. तोंडोळी गावाची अशी अनेक वैशिष्ट्ये जाणवली.
गावात प्रवेश केल्याबरोबर टिपिकल गावगाड्याची जी रचना असते तशी रचना दिसत नाही. गावात मराठा-बौद्ध बांधवांची अगदी शेजारी-शेजारी घरे आहेत. भगव्या झेंड्याशेजारी निळा झेंडाही दिमाखाने डोलताना दिसतो. गावातील बहुतांश लोकांकडे बऱ्यापैकी शेती आहे. शेजारी असलेल्या धरणामुळे शेतीला मुबलक पाणी आहे. प्रगतशील शेतकरी आहेत. त्यामुळे बऱ्यापैकी टामटूम असलेलं हे गाव आहे.
या गावात बहुसंख्य मराठा समाज, त्या खालोखाल बौद्ध समाज आहे. तीन-चार मातंग कुटुंब, काही मुस्लिम कुटुंबं आहे. विशेष म्हणजे गावात ब्राह्मण समाजाचे एकही घर नाही. अशी या गावची सामाजिक रचना आहे. अर्थात, गावकरी अशा जातविभागणीच्या भानगडीत कधीच पडत नाहीत. मराठवाड्यात किंबहुना अवघ्या महाराष्ट्रात अशी अनेक गावे आढळतील की, ज्या गावांत भारतीय संविधानाचे निर्माता डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती उत्सवाला तथाकथित सवर्ण गावकऱ्यांचा तीव्र विरोध असतो. त्यावरून वाद होत असतात. दंगली होतात. पण एक चांगलं चित्रही आता आकाराला येत आहे. तोंडोळी गावात शिवजयंती ज्या उत्साहात निघते त्याच उत्साहात भीमजयंतीही साजरी केली जाते. विशेष म्हणजे सर्व गावकरी या उत्सवात आनंदाने आणि हिरीरीने सहभागी होतात. जुन्या जाणत्या मंडळींवर वारकरी संप्रदायाचा प्रभाव असल्याने जातीभेदाला थारा नाही. अवचितराव मस्के, देवीदास पुंगळे, मंदा सुरेश पुंगळे ही ग्रामपंचायत सदस्य मंडळी, ग्रामसेवक ए. एस. पारेकर तसेच गावातील माजी न्यायाधीश शंकरराव ढवळे, ज्ञानेश्वर ढवळे, अनिल मस्के, बाबासाहेब ढवळे, साईनाथ ढवळे ही मंडळी सातत्याने गावच्या विकासासाठी झटत आहे. गावातील वातावरण शांत राहील याची काळजी घेतात.
गावात साधारण चाळीसएक वर्षांपासून भीमजयंती साजरी केली जाते. त्या तुलनेत शिवजयंती मात्र गेल्या १०-१५ वर्षांपासून साजरी केली जाते. गावात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विचारांचे वारे पुरुषोत्तम खेडेकर यांच्या मराठा सेवा संघाच्या कार्यामुळे वाहू लागले, असे गावकऱ्यांशी चर्चा करताना जाणवले.
गावातील सर्वात ज्येष्ठ नागरिक हिम्मतराव गोपाळराव ढवळे. वयवर्षे अंदाजे ८५. गावकरी त्यांना अण्णा असे संबोधतात. गावात सर्वप्रथम भीम जयंती साजरी करण्यात पुढाकार घेणाऱ्यांपैकी अण्णादेखील एक आहेत. वारकरी संप्रदायाचे त्यांच्यावर संस्कार आहेत. अण्णांना बोलतं करण्याचा प्रयत्न केला. सर्वप्रथम त्यांना विचारले अण्णा शिवाजी महाराजांच्या कार्याविषयी माहिती सांगा. तेव्हा त्यांनी सांगितले की, छत्रपती शिवाजी महाराजांनी अठरापगड जातींना सोबत घेऊन राज्य चालविले. त्यांनंतर अण्णांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्याविषयी विचारले तेव्हा ते म्हणाले, “बाबासाहेबांनी देशाचा एवढा मोठा कायदा लिहिला आहे. त्यांच्या उपदेशाचे आचरण सर्वांनी करणे गरजेचे आहे. जातीच्या कारणावरून गावात आजवर कधीही कोणताही अनुचित प्रकार घडला नाही.”
माजी न्यायाधीश शंकरराव ढवळे हे गावातील प्रगतीशील शेतकरी आहेत. गटशेतीच्या माध्यमातून गावकऱ्यांना शासकीय योजनांचा लाभ कसा मिळवता येईल, यासाठी ते सातत्याने प्रयत्नशील असतात. आजच्या ताणतणाच्या, अशांततेच्या काळात तथागत गौतम बुद्धांचा विचारच माणसाला तारू शकेल, असा ठाम आत्मविश्वास ते व्यक्त करतात. शंकरराव ढवळे यांच्यावर विपश्यनेचा खूप मोठा प्रभाव आहे.
गावचे माजी उपसरपंच ज्ञानेश्वर ढवळे यांनी सांगितले की, शिवजयंतीप्रमाणेच भीम जयंती, माता रमाई जयंतीदेखील खूप उत्साहात साजरी केली जाती. विशेष म्हणजे सर्व गावकरी मंडळी या दोन्ही उत्सवात मनापासून सहभागी होतात. भीमजयंती मिरवणूक गावातून निघते. त्यावेळी आंबेडकरी समाजाबरोबरच मराठा समाजातील स्त्री-पुरुष या जयंती उत्सवात सहभागी होतात. मिरवणूक ज्यांच्या दारात आलेली असेल त्या घरातील सर्व स्त्री-पुरुष मंडळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करतात. रांगोळी घालतात. भीम जयंतीनिमित्त नामांकित वक्त्याचे व्याख्यान आयोजित केले जाते. गावजेवणही दिले जाते.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या मराठी विभागातून एम. ए. झालेले अनिल मस्के हेदेखील गावातील एक प्रमुख असे व्यक्तिमत्तव आहे. बौद्ध आणि मराठा समाजात समन्वय साधण्यात मस्के यांची खूप मोलाची भूमिका असते. भाषा आणि साहित्याचे संस्कार मनावर झालेले असल्यामुळे त्यांचं मनही संवेदनशील आहे. गावच्या विकासाचा ध्यास घेतलेले मस्के आपल्या संवाद कौशल्याने दोन्ही समाजात समन्वय साधतात.
बाबासाहेब ढवळे हे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी स्थापन केलेल्या मिलिंद महाविद्यालयाचे विद्यार्थी. त्यांनी येथून एम. ए. पूर्ण केले. कितीही नाही म्हटले तरी मिलिंदच्या मातीचे संस्कार त्यांच्याही मनावर झाले. सुशिक्षित असल्याने गावात कोणत्याही प्रकारचा वाद होऊ न देणे ही त्यांची भूमिका असते. ते गावातील तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष आहेत. गावच्या विकासासाठी आपल्या शिक्षणाचा उपयोग करतात. गावकऱ्यांना पिण्याचे शुद्ध पाणी मिळावे यासाठी त्यांनी प्रयत्न केले. त्यातून त्यांनी सबंध गावासाठी आर.ओ.ची व्यवस्था केली. त्यामुळे अवघ्या पाच रुपयात गावकरी एक जार भरून शुद्ध पाणी घेतात.
साईनाथ ढवळे हे बी. एस्सी. पदवीधर असलेले गृहस्थ गावातील सामाजिक आणि सांस्कृतिक कार्यात महत्त्वाची भूमिका बजावतात. विशेष म्हणजे त्यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचार आणि कार्याची चांगल्याप्रकारे ओळख आहे. त्यांच्याशी संवाद साधल्यावर त्यांनी सांगितले की, “डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा, ही शिकवण दिली. भारतीय संविधानाची रचना केली. महिलांच्या उन्नतीसाठी हिंदू कोडबील आणले. जातीपातीवरून भेदभाव करणे हे साफ चुकीचे असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. सर्व धर्मियांचे सण गावकरी उत्साहात साजरे करतात. गावात मुस्लिम समाजाची मोजकीच घरे आहेत. मात्र ईद सणावेळी मुस्लिम बांधव समस्त गावकऱ्यांना शिरखुर्मा देतात. सगळेजण मिळूनमिसळून राहतात.
महाराष्ट्राला छत्रपती शिवाजी महाराज, क्रांतिबा ज्योतीराव फुले, राजर्षी शाहू महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर अशा महापुरुषांचा थोर वैचारिक वारसा लाभलेला आहे. तोंडोळीसारख्या छोट्याशा गावाने हा वैचारिक वारसा जपला आहे. या महापुरुषांच्या विचारांचे प्रकट रूप दिसल्यावर खरोखर अभिमान वाटतो. भीम जयंतीवरून किंवा इतर सण-उत्सवावरून होणारे वाद टाळून सर्वांनी गुण्यागोविंदाने नांदण्याचा तोंडोळीवासीयांचा पॅटर्न खरोखर अनुकरणीय आहे. तो समस्त गावांनी जपला पाहिजे, अशी अपेक्षा यानिमित्ताने करायला हरकत नाही.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button