महाराष्ट्रसामाजिक

एकही मुस्लिम कुटुंब नाही, पण लातुरातील नांदगावात होतोय मोहरम…

लातूर : आज देशभरात मोहरमच्या निमित्ताने ताबूत विसर्जनाचा कार्यक्रम सुरू आहे. मुस्लिम धर्मियांमध्ये या धार्मिक कार्यक्रमाचे वेगळे महत्त्व आहे. पण राज्यात अनेक अशी गावं आहेत ज्या गावात मुस्लिम लोकसंख्या काहीच नाही किंवा तुरळक आहे, अशा ठिकाणीही धार्मिक भावनेने मोहरम केला जात आहे.
लातुरातील नांदगावमध्ये एकही मुस्लिम कुटुंब नाही, पण या गावात सात दिवस विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येतं आणि मोहरमच्या दिवशी ताबूत विसर्जन करण्यात येतं. मराठवाड्यातील या गावाने मोहरमच्या निमित्ताने आपलं वेगळंपण जपलं आहे.
लातूर जिल्ह्यातील नांदगाव हे राज्यातील अनेक गावांसारखे एक गाव.. या गावात 250 घरे आहेत. या गावात मोठ्या प्रमाणावर मोहरम साजरा केला जातोय,डोले नाचवले जातात. गावातील अबाल वृद्ध, स्त्री पुरुष यात सहभागी होतात. गावातील सर्व जातीधर्माचे लोक यावेळी एकत्र येतात. पण यामध्ये एकही मुस्लिम व्यक्ती सामील नसतो. कारण या गावात मुस्लिम समाजातील एक ही कुटुंब राहत नाही. निजामकाळापासून या गावात ही परंपरा जोपासली जात आहे

चाकुर तालुक्यात प्रसिद्ध असलेल्या नांदगावातील बाळासाहेब महाराज यांच्या समाधी मंदिरात दरवर्षी मोहरमचे डोले बसविले जातात. सात दिवसांच्या या धार्मिक आयोजनात संपूर्ण गाव सहभाग घेत असते. यावेळी विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. यात कीर्तन भजन आणि भारुड गोंधळ घातला जातो.
शेवटच्या दिवशी बाळासाहेब महाराज समाधी मंदिरातून डोला गावकरी वाजतगाजत, मिरवणूक काढून घेऊन जातात. गावातील मारुती मंदिर, महादेव मंदिरात आरती केली जाते. त्यानंतर गावातील डोलाचे मानकरी गावचे पाटील असलेल्या कुटुंबात नेला जातो. गावातील मानकऱ्याच्या घरी डोला गेल्यानंतर नगर प्रदिक्षणा केली जाते.
गावात एक ही मुस्लिम समाजातील कुटुंब राहत नसतानासुद्धा मागील अनेक वर्षांपासून मोहरममध्ये डोला काढण्याची परंपरा या गावानं जपली आहे. पंचक्रोशीतील अनेक गावातून लोक दरवर्षी डोल्यासाठी नांदगाव मध्ये येत असतात.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button